हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसातच महाराष्ट्रातील बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार होतात . हे टाळण्यासाठीच प्रशासनाने यंदापासून परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. परीक्षा केंद्रांवर पूर्णपणे निगराणी ठेवण्यासाठी आता वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, भरारी पथक आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीम यांचा समावेश असणार आहे. ज्यामुळे परीक्षा 100% कॉपीमुक्त आणि पारदर्शकता वाढण्यास मदत मिळणार आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
परीक्षेच्या तारखा –
10वी आणि 12वीच्या परीक्षा याच महिन्यात सुरु होणार आहेत . म्हणजेच 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) परीक्षा होणार आहे , तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10वी) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
निकोप वातावरणात पार पडणार परीक्षा –
या वर्षी परीक्षा शांत, भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य सरकारने योजलेल्या यशस्वी कॉपीमुक्त अभियानाचा भाग म्हणून या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हि सर्व योजना शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
परीक्षा 100% कॉपीमुक्त होणार –
परीक्षा केंद्रांच्या आसपास ड्रोन कॅमेरे असणार आहेत , ज्यामुळे केंद्रांवर लक्ष ठेवता येणार आहे.
परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा तपासून पाहण्यात येतील.
भरारी पथके आणि बैठी पथके यांची व्यवस्था करण्यात येईल.
परीक्षा केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरणाचा वापर केला जाणार.
फेशियल रेकग्निशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे .
प्रत्येक परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची तपासणी केली जाईल.
या उपाययोजनांच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य सरकारने यावर्षीच्या परीक्षेला 100% कॉपीमुक्त आणि पारदर्शक बनवण्याचे ठरवले आहे.