जूननंतर देशात आर्थिक मंदी? नारायण राणेंनी व्यक्त केली शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात जगभरात आर्थिक मंदीचे (Economic Recession) संकट असतानाच भारतात सुद्धा जून नंतर आर्थिक मंदी अपेक्षित आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. भारताच्या G-20 अध्यक्षतेखालील G-20 च्या IWG (इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप) ची पहिली बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आर्थिक मंदीच्या शक्यतेवर भाष्य करताना जून नंतर देशात मंदी येऊ शकते असं म्हंटल आहे.

जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये मंदी आहे. भारताला त्याची झळ बसू नये आणि मंदी आली तर जूननंतर येईल. आर्थिक मंदीची झळ देशातील नागरिकांना बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत असेही नारायण राणे म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या नेतृवाखाली भारत प्रगती करत आहे. देशाच्या जीडीपी मध्ये कमालीची वाढ होत आहे. ८ वर्षापूर्वी आपला देश जिडीपीच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर होता. आता आपण ५ व्या क्रमांकावर असून येत्या १० वर्षांत आपण तिसर्‍या क्रमांकावर जाऊ . हे सगळं फक्त नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे असं म्हणत नारायण राणे यांनी मोदींच्या नेतृत्त्वाचे कौतुक केलं.