शिक्षण विभागाने शाळा बंद केल्याने चोवीस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। गजानन भूंबरे   

मागील शैक्षणिक वर्षांपासून पटसंख्या कमी आहे चे कारण देत परभणी जिल्ह्यातील वसंतनगर तांडा येथील प्राथमिक शाळा बंद झाली अन् त्याच बरोबर इथे शिकणाऱ्या चोवीस विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे . शाळा बंद केल्यानंतर चार किलोमीटर दूर पाथरी शहरामध्ये सदरील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. शाळेत वाहनाने जाण्यासाठी पैसे देऊ असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परंतु शाळा बंद झाल्यानंतर ऑटोचे पैसे न मिळाल्याने आठ किलोमीटर जाण्या-येण्याची पायपीट मात्र या चिमुकल्यांच्या नशिबी आली आहे.

पाथरी तालुक्यातील रेनापुर शिवारामध्ये वीस ते पंचवीस घरे आणि बंजारा समाजाची अशी मिळून 200 लोकसंख्या आहे. या वस्तीला वसंत नगर तांडा असे नाव आहे. तांड्याच्या आजूबाजूला असणाऱ्या 60 एकर क्षेत्रावर शेती उत्पादनातून येथील लोकांची उपजीविका चालते. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते चौथी चे चार वर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षापासून चालू होते. मागील वर्षी शाळा बंद होईपर्यंत या ठिकाणी 24 विद्यार्थी शिक्षण घेत होते व त्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. छोट्या जागेमध्ये दोन वर्ग खोल्या, एक कार्यालय, त्यासमोर छोटेसे मैदान असे चित्र दीड वर्षापूर्वी पहायला मिळायचे.

रोज शाळेत ४ किमी चालत जाणाऱ्या विद्यार्थिनी

वस्तीवरची शाळा असल्याने मुलेही दररोज शाळेत यायची. पण मागील शैक्षणिक वर्षामध्ये एक शिक्षक तीस विद्यार्थी पटसंख्या शिक्षण विभागाला येथे आढळून आली नाही. त्यामुळे दोन शिक्षक असणाऱ्या या शाळेत पटसंख्या कमी आहे हे कारण देत शाळा बंद करण्यात आली. पर्यायाने या विद्यार्थ्यांना वस्तीपासून चार किलोमीटर दूर पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲडमिशन देण्यात आले. तसेच त्यावेळी प्रति विद्यार्थी तीन हजार रुपये विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याच्या सोयीसाठी वाहन व्यवस्था म्हणून शिक्षण विभाग देणार असे पालकांना सांगण्यात आले. वस्तीवर बहुतांश पालक हे अशिक्षित आहेत. त्यांनी शिक्षण विभागाला यासंदर्भात विरोध दर्शवला नाही. मागील शैक्षणिक वर्ष संपले पण ठरल्याप्रमाणे प्रवासाचा एकही रुपया शिक्षण विभागाने या पालकांच्या हातात ठेवला नाही. दुष्काळी परिस्थितीमध्ये जगण्याची भ्रांत असताना मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची चणचण असल्याने मुलांच्या ने आणण्यासाठी लावलेला ऑटो-रिक्षा पालकांनी बंद केला आणि तिथून पुढे सुरू झाली मुलांची पायपीट.

विद्यार्थ्यांना चिखलातून करावी लागते पायपीट

चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला याच मुलांनी काही दिवस शाळेला जायचा प्रयत्न केला, हळूहळू लहान-लहान विद्यार्थ्यांनी शाळेला जाणे टाळले. अधून-मधून ही विद्यार्थी शाळेला जातात पण बहुतेक वेळा आठ किलोमीटरच्या पायपिटीला ते कंटाळतात. बहुतांश पालकांना आपल्या पाल्यांनी शिकावं असं वाटतं. पण आता आपलं ऐकणार कोण असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

फक्त निवडणुका पुरते लोक आमच्या वस्तीवर येतात, आम्ही ज्या ग्रामपंचायतींमध्ये मतदान करतो तिथे आम्हाला प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे आमचा प्रश्न कोणाकडे मांडता येत नाही असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. निवडणुक आली आहे म्हणून सध्या कच्चा रस्ता केल्या जातोय. आधुनिकता म्हणून मागील दोन-तीन वर्षांपूर्वी खांबावरून दोन तारा बांधत इथे विजेची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. असेही येथील रहिवासी सांगतात असे ही स्थानिक रहिवाशी सांगतात.

तांड्यावरील आधी शाळेत शिकणारी मुले

मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणाऱ्या शाळेच्या उघड्या वर्गखोल्या मध्ये आता शेतातील कापणी केलेल्या पिकांचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. वस्तीवरिल वयाने मोठी असणारी मुले -मुली मात्र शाळेत जातात पण कच्चा रस्ता असल्याने पावसाच्या दिवसांमध्ये चिखल तुडवीत त्यांना शाळेत जावं लागतं.

गावातील लहान विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेत का जात नाहीत ? असा प्रश्न विचारल्यावर , “तुम्ही ऑटो लावा ना आम्ही शाळेला जातो ” अशी त्यांनी मागणी केली. पालक मुलांना शिक्षणाची ओढ असून शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे जिल्हातील अशा अनेक तांडा, वस्तीवरिल विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. निजाम काळामध्ये गावागावांमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत होतं. पण आज स्वतंत्र भारतातील मराठवाड्यामध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण असतानाही शासन , शिक्षण विभागाच्या धोरणाचा गाव वस्तीवरील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. त्यांना शिकण्याच्या मुलभूत अधिकारा पासून वंचित रहावं लागतयं यापेक्षा दुसरं दुर्देव ते कोणतं ?

Leave a Comment