हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eggless Omelette) दगदगीच्या आयुष्यात रोज काहीतरी चमचमीत आणि जिभेचे चोचले पुरवले जातील असे चवीला भन्नाट पदार्थ खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे रोजची पोळी भाजी आणि डाळ भात खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं मात्र पौष्टिक आणि तितकंच चविष्ट खायला मिळणार असेल तर कोण नाही म्हणेल? अनेक लोक नाश्त्यामध्ये अंड खाणं पसंत करतात.
ऑम्लेट हा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. त्यामुळे अनेक घरात नाश्त्यासाठी ऑम्लेट ब्रेड, ऑम्लेट पाव किंवा प्लेन ऑम्लेट बनवलं जातं. पण तुम्ही कधी अंड्याशिवाय ऑम्लेट बनवले आहे का? अहो आश्चर्यचकित काय होतंय? खरंच अंड्याशिवाय ऑम्लेट बनतं. आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर चला जाणून घेऊया.
५ मिनिटात बनवा अंड्याशिवाय ऑम्लेट (Eggless Omelette)
लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा ऑम्लेट हा पदार्थ अंड्याशिवाय बनू शकतो ही कल्पनाच करून थोडं विचित्र वाटतं ना? पण खरोखरच अंड्याशिवाय ऑम्लेट बनवता येतं. जे चवीला एकदम बेस्ट आणि तब्येतीसाठी अतिशय पौष्टिक मानलं जातं. (Eggless Omelette) कारण, या ऑम्लेटमध्ये अंड्याऐवजी टोमॅटो आणि तांदूळ तसेच बेसनचा वापर केलेला असतो. मुख्य म्हणजे, हे ऑम्लेट बनवायला ५ मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अगदी कमी वेळात नाश्त्यासाठी पौष्टिक आणि शाकाहारी काही बनवायचे असेल तर हे ऑम्लेट एकदा जरूर बनवून पहा. आता ते कसे बनवायचे हे जाणून घेऊ.
‘असे’ तयार होते टोमॅटो ऑम्लेट
हे ऑम्लेट तयार करण्यासाठी २ वाट्या डाळीचे पीठ अर्थात बेसन, दोन टेबलस्पून तांदळाची पिठी, ५ ते ६ लसणीच्या पाकळ्या आणि त्यासोबत ३ ते ४ गडद हिरव्या मिरच्या, सोबत पाव किलो टोमॅटो बारीक चिरलेले आणि पाव चमचा हळद, आवश्यकतेनुसार मीठ, तेल अन् बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या. (Eggless Omelette)
आता ऑम्लेट बनवण्यासाठी डाळीच्या पिठात तांदळाची पिठी आणि पाव चमचा हळद घालून घ्या. दरम्यान, मिक्सरमध्ये टोमॅटो, लसूण आणि मिरची एकत्र करून व्यवस्थित बारीक करून घ्या. हे मिश्रण पिठात मिसळून चांगले रसरशीत भिजवून घ्यावे. यामध्ये कोथिंबीर घाला आणि गॅसवर तवा ठेवून त्यावर तेल शिंपडून घ्या.
गॅसवर ठेवलेला तवा तापला की त्यावर पिठाचे जाडसर ऑम्लेट घाला आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्या. एका बाजूने खरपूस भाजल्यानंतर हळूच दुसऱ्या बाजूने परता आणि भाजून घ्या. (Eggless Omelette) अगदी दोन ते तीन मिनिटात हे ऑम्लेट तयार होईल. मुख्य म्हणजे, हे ऑम्लेट तुम्ही चपाती किंवा ब्रेड सोबत अगदी सहज खाऊ शकता. अत्यंत चमचमीत आणि खरोखरच जिभेचे चोचले पुरवणारा हा पदार्थ अत्यंत पौष्टिक असल्यामुळे मुलांसाठी डब्याला उत्तम पर्याय सिद्ध होतो.
थोडेसे महत्त्वाचे
हा पदार्थ बनवण्यासाठी डाळीचे पीठ घुसळलेल्या टोमॅटोत भिजवा. म्हणजे याची चव थोडीशी आंबटसर येईल. शिवाय या मिश्रणामध्ये अर्धा चमचा जिरं थोडसं कुटून आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यास अधिक चांगली चव येते. त्यामुळे आणखी चांगल्या चवीची अपेक्षा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. (Eggless Omelette) ही रेसिपी सौ जयश्री देशपांडे यांच्या ‘हमखास पाकसिद्धी’ या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिचा आजपर्यंत अनेक गृहिणींनी आपल्या कुटुंबासोबत आस्वाद घेतला आहे.