नाथाभाऊंचा भाजप प्रवेश ‘या’ राजकारण्यांमुळे अडलाय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी कुठल्या पक्षात प्रवेश करत नाहीये. तर मी जे घरट बांधलंय त्यात पुन्हा जातोय… एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याच्या निर्णयावर खडसेंनीच दिलेली ही प्रतिक्रिया… मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय. माझा पक्षप्रवेश हा दिल्लीत होईल, असं ठामपणे सांगणाऱ्या खडसेंची मात्र ही राजकीय गाडी मधल्या मध्येच लटकलीय. रक्षा खडसेंना रावेरमधून पुन्हा एकदा निवडून आणायचं असेल तर नाथाभाऊ आपल्या पक्षात असणं किती महत्वाचं आहे, याची किंमत भाजप हायकमांडला पक्कं ठाऊक आहे. त्यात खडसे एकेकाळचे भाजपचे राज्यातील पहिल्या फळीचे नेते होते, त्यामुळे त्यांचा इमान इतबारे पुन्हा पक्षप्रवेश घडवून आणणं, ही गोष्ट तशी भाजपसाठी महत्वाची आहे. नाथाभाऊ यांचा जळगावच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील होल्ड पाहता या पट्ट्यातल्या निवडणुकांच्या आधीच हा पक्ष प्रवेश होणं अपेक्षित होतं. पण या सगळ्याला खीळ बसली ती भाजपच्याच राजकीय नेत्यांच्या काही विरोधामुळे… नाथाभाऊ भाजपतील कोणत्या तीन नेत्यांना नडलेत ज्याचीच परतफेड हे नेते आता नाथाभाऊंच्या पक्षप्रवेशाला आडवं पूर्ण करतायत? पॉलिटिकल करिअरच्या शेवटाला येऊन नाथाभाऊंचं हे असं तळ्यात मळ्यात का झालंय? त्याचाच घेतलेला हा इंटरेस्टिंग मागोवा…

नाथाभाऊंचा भाजप पक्षप्रवेश ज्या नेत्यांमुळे लटकलाय, त्यातलं पहिलं नाव येतं ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं… नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाला मान्य करून कुणी पक्षात येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. असा पक्षप्रवेश होणार असल्याचं अजून आपल्याला दिल्लीतून सांगण्यात आलेलं नाही, नाथाभाऊंच्या पक्षप्रवेशावर जेव्हा फडणवीसांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थोडीशी नाखुशीनेच का होईना पण दिलेली ही प्रतिक्रिया. राज्यातील भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस गट आणि विनोद तावडे गट असे दोन गट आहेत. खरंतर तावडे, खडसे हे पक्षातील जुने पहिल्या फळीतील नेते. पण फडणवीसांची एंट्री झाल्यापासून त्यांनी पक्षातील कडव्या स्पर्धकांना हळूहळू साईडलाईन केलं. विनोद तावडे, नाथाभाऊ आणि पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला नख लावत ‘सब कुछ फडणवीस‘ अशी हवा तयार केली. यानंतर नाथाभाऊंनी पक्षात असतानाच फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले. पुढे वाद टोकाला गेला आणि नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेतलं. पंकजाताईंचीही पक्षातील घुसमट ही काही लपून राहिलेली नाहीये. पण विनोद तावडेही जेव्हा साइडलाईन झाल्यावर त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षासाठी काम करायला सुरुवात केली. शांतीत क्रांती करत ते सचिवापासून महामंत्री झाले…तावडेंना दिल्लीतून बळ मिळू लागलं तसे ते पुन्हा राज्याच्या राजकारणात ॲक्टिव्ह झाले.

BJP मध्ये जाण्याची घोषणा करूनही Eknath Khadse यांना विरोध कुणाचा? व्हिलन कोण?

पंकजा ताईंना मिळालेलं लोकसभेचं तिकीट, नाथाभाऊंना पुन्हा एकदा पक्षात घेण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्या खेळ्या दिल्लीतून तावडे करतायत असं बोललं जातंय. तावडे यांच्याकडून भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे यांची ही धडपड आहे. तावडे आणि आपले चांगले संबंध आहेत. बरीच वर्षे आम्ही पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. माझी ताकद त्यांना माहिती असल्याने कदाचित प्रेमापोटी ते माझ्या घरवापसीसाठी जोर लावत असावेत, राष्ट्रवादीत असतानाच नाथाभाऊंनी भविष्याचा बांधलेला हा अंदाज आज तंतोतंत खरा ठरतोय. म्हणजेच दिल्लीच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा तावडे गट सक्रिय होतोय. तावडे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा असतील, अशीही चर्चा आहे. थोडक्यात नाथाभाऊ पक्षात येणं म्हणजेच तावडेंचं महाराष्ट्रातील वजन वाढणार, हे कन्फर्म आहे. त्यात नाथाभाऊ यांनी आपल्यावर केलेले अनेक गंभीर आरोप आणि टीका हे सगळं सोसूनही त्यांना फेस करणं ही फडणवीसांसाठी मोठी डोकेदुखी असणार आहे. यामुळेच कदाचित खडसेंचा पक्षप्रवेश होल्डवर पडला असावा…

यातलं दुसरं नाव येतं ते अर्थात गिरीश महाजन यांचं…

गिरीश महाजन (Girish Mahajan) वर्सेस नाथाभाऊ यांच्यातला वाद हा महाराष्ट्राला काही नवा नाहीये. नाथाभाऊंनी भाजपात असताना मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादीत तर असेपर्यंत नाथाभाऊंचा पॉलिटिकल स्पेस महाजनांनी घेतला. जळगावच्या राजकारणात महाजनांचं वजन वाढलं. तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांच्यात हमरी तुमरी सुरू झाली. राजकीय पासून खासगी आयुष्याबद्दलही एकमेकांवर टीका झाल्या… खरंतर पक्ष वेगळे असल्यामुळे या टीका तशा मनमोकळ्या होत होत्या. पण आता एकाच पक्षात पुन्हा काम करावं लागणार असल्यामुळे आणि त्यात दोन्ही नेते एकाच जिल्ह्यातून पॉलिटिकल बेस तयार करणारे असल्याने महाजनांना खडसे पुन्हा येणं म्हणजे मोठी किटकिट वाटत असणार. म्हणूनच की काय खडसेंना दिल्लीतील हाय कमांडकडून पुन्हा पक्षात घेतलं असताना आणि स्वतः खडसेंनी हे पब्लिकली जाहीर केलेलं असतानाही महाजनांनी टीकेची धार कमी होऊ दिली नाही.

‘दूध संघ गेला . ग्रामपंचायत पण नाही. बँक नाही. आमदारकीमध्ये मुलगी पडली. त्यांचा दिवा विझला आहे. एकनाथ खडसे याचं आता काय राहीलं आहे.’ असं म्हणत महाजनांनी नाथाभाऊंचं पक्षात जाहीर स्वागत केलं. थोडक्यात नाथाभाऊ भाजपवासी झाले तरी खडसे विरुद्ध महाजन हा संघर्ष टिपेलाच राहणार असल्याचा जणू ट्रेलर महाजनांनी यातून दाखवून दिला. पण जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा निवडून आणायच्या असतील तर भाजपाला खडसेंशिवाय पर्याय नाहीये. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे महाजनांनी आपली माणसं पेरल्यामुळे एन निवडणुकीच्या तोंडावर महाजनांना नाराज करणंही परवडणार नाहीये. हीच सगळी कंडीशन पाहता खडसेंचा पक्षप्रवेश हा लोकसभेनंतर पुढे ढकलला असावा…

नाथाभाऊंच्या हातात पुन्हा कमळ द्यायला विरोध होतोय तो मंगेश चव्हाण यांचा..

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे खडसेंना थेट भिडणारं जिल्ह्यातील मोठं नाव. मंगेश चव्हाण हे तसे गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक. महाजनांच्याच आशीर्वादाने चव्हाण चाळीसगावातून निवडून आले. त्यात जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर चव्हाण यांना वर्चस्व गाजवायचं असल्यानं त्यांना इथून कडवा विरोधक हा अर्थातच खडसेंचा असणार आहे. खडसेंच्या ताब्यातील दूध संघाच्या निवडणुकीत चव्हाण यांनी नुकतंच वजन वाढवून खडसेंचं वर्चस्व मोडीत काढलं होतं. आता पुन्हा एकदा हेच खडसे आपल्या पक्षात आल्यास त्यांच्या सीनिओरिटीमुळे आपल्या राजकारणाला धक्का बसू शकतो, हे मंगेश चव्हाणांना पक्कं ठावूक आहे. म्हणूनच खडसे जेव्हा महाजनांवर आरोप करतात तेव्हा जणू हा आपल्यावरच वार करण्यात आलाय, त्याप्रमाणे चव्हाण खडसेंचा समाचार घेत असतात. स्थानिक नेतृत्वाच्या याच संघर्षातून चव्हाण खडसेंना सध्या शिंगावर घेत त्यांच्या पक्षप्रवेशाला आडवं लावताना दिसतायत…

थोडक्यात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण हे राजकारणातील त्रिकूट सध्या नाथाभाऊंसाठी काळ बनून उभे आहेत. राष्ट्रवादीनं विधान परिषदेवर पाठवून नाथाभाऊंचं राजकीय पुनर्वसन केलेलं असतानाही त्यांनी पुन्हा भाजपा जाण्याचा निर्णय घेतला…मीडियासमोर तो जाहीर बोलून दाखवला… पण भाजपनं पक्षप्रवेश लटकत ठेवल्यानं आता त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. अशा राजकीय संभ्रमात नाथाभाऊ सुनेच्या पाठीशी आपली पुरी ताकद लावू शकतील का? हा ही मोठा प्रश्नच आहे…