साताऱ्यातील ‘या’ मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे ते अधून मधून आपल्या गावी येत असतात. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मोहिमेच्या स्वागताला भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे येणार आहेत. राजधानी सातार्‍यातून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर येणार्‍या मानाच्या कलशाचे स्वागत यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने बारा वर्षांपासून “राजधानी ते राजधानी” अशी मोहीम राबवली जाते. सातार्‍यातून येणार्‍या मंगल कलशाला रायगडावर विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यंदा 350 वा राज्याभिषेक दिन असून यंदा ही मोहीम गुरुवार 1 जून रोजी सकाळी 10 वाजता सातार्‍याच्या शिवतीर्थावरून सुरु होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून येणार्‍या मोहिमेतील शिवभक्तांचे एकत्रीकरण हे महाबळेश्वरच्या पुढे प्रतापगड फाट्यावर होणार आहे. मोहिमेतील सर्व भक्तांनी गुरुवारी सायंकाळी 6.00 वाजता पाचाडला पोहोचणे अपेक्षित आहे. यंदाच्या ३५० व्या वर्षांनिमित्त पुढील एक वर्षात एक लाख अमराठी शिवभक्त रायगडावर आणण्याच्या मोहिमेचा शुभारंभ डॉ. संदीप महिंद गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई, बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, झेडपी सीईओ ज्ञानेश्वर खिलारी आदी मान्यवर व शिवभक्तांच्या उपस्थितीत सुरू होणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने सचिव महेश पाटील व शेखर तोडकर यांनी दिली.

असा पार पडणार कार्यक्रम

सातारा जिल्ह्यातील बारा नद्यांच्या जलाचे पूजन करून हा कलश तयार होतो. गुरुवारी मध्यरात्री हा कलश रायगडावर दाखल होईल. भल्या पहाटे शिरकाई देवीच्या मंदिरात कलशाचे विधिवत पूजन होऊन जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या दर्शनानंतर हा कलश होळीच्या माळावरून राजसदरेकडे निघेल. पहाटे याचे स्वागत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कलशाचे स्वागत होईल आणि मुख्य राज्यभिषेकाला प्रारंभ होईल.