लवकरच अयोध्येला जाणार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदारांसोबत घेऊन अयोध्येला लवकरच जाणार आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन आणि अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

ठाणे येथे शिरोमणी महाराज बिजली पासी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारताची संस्कृती एकमेकात मिसळून गेली आहे. तुम्हीही महाराष्ट्रीयन झाला आहात. तुमच्यामुळे आम्हीही वारंवार अयोध्येला जात आहोत. पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले.

हे जनतेचं सरकार आहे. सर्व जातीपातींना सोबत घेऊन आम्हाला विकास करायचा आहे. तुम्ही जिथे जिथे असाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता मी मुख्यमंत्री आहे. तुम्हाला त्रास होणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हंटले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट गुवाहाटी गाठली. त्यांचा गुवाहाटी दौरा चांगलाच चर्चेत राहिला. दरम्यान गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर आता शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या अयोध्येच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.