विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार CID चौकशी; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मेटे यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच त्याच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्याच्या पत्नीसह राजकीय नेत्यांनी केली. यानंतर विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मेटेंच्या अपघाताच्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण 150 मीटर अगोदर विनायक मेटे यांची मोटार त्यांच्या गाडीच्या पुढे असलेल्या ट्रकसदृश अवजड वाहनावर जोरदार धडकली. हा अपघात इतका मोठा होता की, चक्काचूर झालेल्या मोटारीच्या डाव्या भागातून त्यांच्या अंगरक्षकास दरवाजा कापूनच बाहेर काढावे लागले.

मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांनी माध्यमाशी बोलताना या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.