Wednesday, October 5, 2022

Buy now

‘मिशन 48’ हे भाजप आणि शिवसेना युतीचं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन 48’ राबवणार असल्याचे आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपकडून मिशन 48 राबविणार असल्याने शिंदे गटाबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. “भाजप मिशन 48 राबवत आहे ही चांगली गोष्ट आहे. मिशन 48 हे भाजप आणि शिवसेनेचं मिळून आहे. आम्ही युतीत आहोत. राज्यात आमचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मजबुतीनं काम करू,” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असून त्यांनी नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सरकार स्थापनेचा आणि कोर्टाच्या खटल्याचा काहीच संबंध नाही. कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तारावर कोणताही स्टे दिलेला नाही. त्यामुळे विस्तार लवकर होईल. आम्ही नवीन सरकार स्थापन केलं आहे. थोडा वेळ देणार की नाही?, असा सवाल शिंदे यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अजित पवार यांच्याशी नुकतीच माझी भेट झाली. पूरपरिस्थितीबाबतचं निवेदन देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी तुम्ही दोघे चांगलं काम करत आहात. लवकर लवकर निर्णय घेत आहात, असं अजितदादा म्हणाले होते. अजितदादा आणि आमचे चांगले संबंध आहेत. अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या मिशनबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45 नाही तर मिशन 48 असणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर विजय मिळवणार आहोत, आम्ही आता नवीन मित्र जोडले आहेत.