मराठ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन अपघाताची माहिती घेतली. “आज मराठ्यांसाठी संघर्ष करणारा नेता हरपला. त्यांनी मराठा समाजाच्या विकासाचा ध्यास घेतला होता,” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले.

रुग्णालयात अपघाताची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता आज हरपला. अनेक आंदोलने त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. ते जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा त्यांची तळमळ आम्हाला जाणवली.

मागील आठवड्यात त्यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यांचा एकच ध्यास होता की, देवेंद्र फडणवीस व तुम्ही आता एकत्रित आहात त्यामुळे आता मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. एक विश्वास होता त्यांच्य मनामध्ये. आज आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक महत्वाची बैठक लावली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले. शासन त्यांच्या कुटूंबासोबत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांचे अत्यंत संघर्षशील असे नेतृत्व होते. अतिशय गरिबीतून वर येऊन स्वतःच्या विश्वासावर उभे राहिलेले नेतृत्व हे होते. अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा मेटे साहेबांनी त्याठिकाणी लढला. आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांचा मोठा अभ्यास होता. ते माझे अतिशय जवळचे सहकारी होते. गेल्या आठ ते दहा वर्षात आम्ही खूपच जवळून काम केले.

काल रात्री सव्वा दोन वाजता त्यांचा मला एक मॅसेज आला कि मुख्यमंत्री साहेबांनी मराठा आरक्षणसंदर्भात आज बैठक बोलवली असून मी जात आहे. अत्यंत मराठा समाजासंदर्भात तळमळ विनायक मेटे यांच्यामध्ये होती, असे फडणवीस यांनी म्हंटले.