निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला दणका; WhatsApp वरील ‘विकसित भारतचा’ प्रचार होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabah Election 2024) बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्चला मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आणि देशात आचारसंहिता सुद्धा लागू केली. मात्र तरीही व्हाट्सअप वर ‘विकसित भारत’ (Viksit Bharat) नावाच्या जाहिरातीतून मोदी सरकारची जाहिरातबाजी सुरु आहे. मोदी सरकारने आत्तापर्यंत केलेली कामांची जाहिरात या मेसेज द्वारे लोकांपर्यंत पोचवण्यात येत आहे . मात्र आता निवडणूक आयोगाने मोदी सरकारला दणका दिला आहे . विकसित भारतच्या जाहिराती व्हॉट्सअॅपवरुन पाठवणं बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. मात्र आत्ता देशात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतरही सरकार व्हॉट्स ऍप विकसित भारतचे मेसेज पाठवत असल्याच्या तक्रारी आयोगाला मिळाल्या होत्या. यावरुन निवडणूक आयोगानं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला एक नोटिस बजावली आहे. निवडणुकांमध्ये समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

आयोगाकडून उचलल्या जाणाऱ्या आवश्यक पावलांचा हा एक भाग आहे. आयोगाने मंत्रालयाकडून या प्रकरणाचा अनुपालन अहवालही मागवला आहे. खरं तर आयोगाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की, सार्वत्रिक निवडणुका 2024 ची घोषणा आणि आचारसंहिता लागू होऊनही, सरकारच्या योजनांची माहिती देणारे मेसेज अजूनही देशातील नागरिकांच्या व्हाट्सअप अकाउंट वर पाठवले जात आहेत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या व्हाट्सअप मेसेजवर आक्षेप घेतला होता. दोघांनी आयोगाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने मोदी सरकारला दणका दिला आहे.