हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicle) चलती आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून स्वतःची सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आताही निवडणुकीच्या तोंडावर सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 (Electric Mobility Promotion Scheme) जाहीर केली असून त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या स्कीम अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर तब्बल 50 हजारांची सबसिडी ग्राहकांना मिळू शकते.
यापूर्वी केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सर्वात अगोदर फेम 1 योजना सुरु केली. त्यानंतर केंद्राने फेम 2 योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सबसिडी मिळत होती. आता 31 मार्च 2024 रोजी (FAME-2) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर अवजड उद्योग मंत्रालयाने देशातील ई-वाहतुकीला चालना देण्यासाठी ही नवीन योजना (ई-ट्रान्सपोर्ट प्रमोशन स्कीम 2024) जाहीर केली. मोदी सरकार देशात ई-वाहतुकीला चालना देण्यासाठी वचनबद्ध असून इलेक्ट्रिक गाडयांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हि योजना आणली असल्याची माहिती अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी दिली.
कोणत्या वाहनाला किती सबसिडी –
इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 अंतर्गत, प्रत्येक इलेक्ट्रिक दुचाकीसाठी 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याअंतर्गत 3.3 लाख दुचाकीं वाहनांना मदत केली जाईल. यामध्ये छोट्या तीन-चाकी वाहनांच्या (ई-रिक्षा आणि ई-कार्ट) खरेदीसाठी 25,000 रुपयांपर्यंतची सबसिडी मिळेल यामध्ये जवळपास 41,000 हून अधिक वाहनांचा समावेश असेल. तर मोठ्या तीनचाकी वाहन खरेदीसाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. सरकारच्या या धोरणामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.