हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस पक्षाचे मुंबईचे माजी शहराध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले गेले होते. दरम्यान आज सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्याच्या राजकरणात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी देखील त्यांनी महत्वाचा वाटा उचलला. मुंबईतील धारावी भागात काँग्रेस पक्षासाठी त्यांनी मोठं काम केलं होतं. मुंबई शहर अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दोन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य मुंबई मतदार संघातून नेते खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. जुलै 2019 मध्ये मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री म्हणून काम पाहत आहेत.
एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली त्यांच्या निधनामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की,’काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन दुःखदायक आहे. वंचित व उपेक्षित समाजांचे शैक्षणिक उत्थान व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी अथकपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली!’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन दुःखदायक आहे. वंचित व उपेक्षित समाजांचे शैक्षणिक उत्थान व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी अथकपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 28, 2021