EPFO Pension| नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वांचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागून राहिले आहे. २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार किमान पेन्शन रक्कम दरमहा ७५०० रुपये करण्याचा प्रस्ताव सादर करू शकते. सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (EPFO) खासगी कर्मचाऱ्यांना केवळ १००० रुपये पेन्शन दिली जात आहे. परंतु नवीन प्रस्ताव मंजूर झाल्यास पेन्शनच्या रकमेत वाढ होईल.
पेन्शन वाढीची मागणी (EPFO Pension)
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी किमान पेन्शन रक्कम ७५०० रुपये करण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्थिर व सन्मानाने जीवन जगण्यासाठी पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली होती. त्यावेळी, याबाबत विचार करण्यात येईल आणि निर्णय ही घेण्यात येईल, असे आश्वासन सीतारामन यांनी दिले होते.
दरम्यान, २०१४ मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांसाठी १००० रुपयांची पेन्शन लागू करण्यात आली होती. मात्र आता वाढती महागाई आणि बदललेल्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर किमान पेन्शनमध्ये(EPFO Pension) वाढ करण्यात अशी मागणी कर्मचारी करत आहेत. ही मागणी आता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कर्मचाऱ्यांना होणारे फायदे
पेन्शन वाढीच्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते. तसेच, ७५०० रुपयांची पेन्शन कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. महत्वाचे म्हणजे, खासगी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून घेण्यात आलेला पेन्शन वाढीचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.