मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटींचा खर्च.., शिवसेनेचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील काही भागात योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या उद्भवल्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही तसेच गावातील लोकांना देखील पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अशा स्थितीत नागरिकांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे? मुख्य म्हणजे या सर्व प्रश्नांना घेऊन संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, “सरकारने मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च केले” असा गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

सामनाच्या आग्रलेखातून टीका

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पालिकेच्या निधीतूनच हा खर्च करण्यात आला आहे. परंतु या अग्रलेखात नक्की कोणत्या पक्षाने नगरसेवक फोडण्यासाठी एवढा खर्च केला याबाबत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी राजकीय वर्तुळात प्रयत्न सुरू असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आले आहे. या अग्रलेखात अप्रत्यक्षपणे शिवसेनेकडून थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर, सामनाच्या अग्रलेखातून शेतकऱ्यांच्या मुद्यांना धरून राज्य सरकारवर देखील टीका करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री स्वत:ला शेतकरी पुत्र समजत असतात. ते हेलिकॉप्टरने येऊन शेती करतात. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पंचतारांकित शेतकरी आहेत. पवार-शिंदे यांना रताळे जमिनीत उगवते की झाडावर हे माहीत आहे. पण महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उपाययोजना नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याही ते थांबवू शकत नाही” अशी जहरी टीका अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे.

जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही..

दरम्यान “राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाईल. नगरसारख्या जिल्हय़ात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळाचा वणवा आहे. अशाने शाळा बंद पडतील. लहान उद्योग थांबतील. गावांचे स्थलांतर होईल. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज राज्यकर्त्यांत दिसत नाही. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांत जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही.” अशी माहिती देत सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.