सर्वात मोठी बातमी!! संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुंबईतील महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती, तसेच काँग्रेसने वायव्य मुंबई लोकसभा जागा ठाकरे गटाला देऊ नये असं म्हणत निरुपम यांनी पक्षाला ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. नंतर आपण आपली भूमिका जाहीर करू असे त्यांनी म्हंटल होते. तत्पूर्वी काँग्रेसनेच निरुपम यांची हकालपट्टी केली आहे.

खरं तर संजय निरुपम यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम या जागेवर दावा केला होता. मात्र या जागेवर चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर निरुपम यांनी सातत्याने शिवसेनेविरोधात आक्रमक वक्तव्य केली, तसेच काँग्रेस पक्षाला सुद्धा अनेकदा घरचा आहेर दिला होता. निरुपम यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसलाच ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला. अखेर पक्षानेच त्यांची हकालपट्टी करत (Expulsion of Sanjay Nirupam from Congress party) मोठा निर्णय घेतला.

काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निरुपम शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे. याबाबत आज मोठा खुलासा होऊ शकतो. संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी ते आपली आगामी भूमिका स्पष्ट करतील. संजय निरुपम आता भाजप किंवा शिंदे गट या दोन्हीपैकी एका पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. संजय निरुपम यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास एकप्रकारे त्यांची घरवापसी म्हणता येईल.