Mhada कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ही असेल अंतिम तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कोकण भागात घरांच्या किमतीत वाढ झाली असल्यामुळे नागरिकांकडून म्हाडाच्या सोडतीसाठी मोठया प्रमाणात अर्ज भरले जात आहेत. मध्यंतरी म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाने ठाणे शहर, ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील 5 हजार 311 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केली होती. याच सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे अर्जविक्री- स्वीकृतीसाठी एका महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसारच आता, सोडतीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर 13 डिसेंबर रोजी सदनिकांची सोडत काढली जाईल.

म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या 5 हजार 311 घरांच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे आता 18 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना आरटीजीएस एनईएफटीद्वारे अनामत रकम भरून अर्ज दाखल करता येणार आहेत. यापूर्वी सदनिकांची सोडत 7 नोव्हेंबर रोजी काढली जाणार होती. मात्र आता मुदत वाढीमुळे ती 13 डिसेंबरला काढण्यात येणार आहे. मंडळाकडून ही मुदतवाढ करण्यात आल्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, गेल्या सप्टेंबर महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडते ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर, 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली होती. या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर अशी ठेवण्यात आली होती. मात्र नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद बघता अर्जविक्री-स्वीकृतीची मुदतवाढ करण्यात यावी असा प्रस्ताव कोकण मंडळाने म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावालाच शुक्रवारी जयस्वाल यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी मिळाल्यामुळे आता अर्जदारांना 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

नागरिकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी म्हाडा मंडळाने ऑनलाईन सेवा आणली आहे. ज्यामध्ये नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्यात आल्या आहेत. या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करता येत आहे. त्यासाठी https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.