क्रिमरोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावे कवितांच्या गावा | नितीन चंदनशिवे

क्रिमरोल वर सुद्धा कविता होते आणि लिहिता लिहिता रडवून जाते.आपणाला ही नक्कीच भावेल ही कविता.
आणि तसंही प्रत्येकाच्या संघर्षाची कथा या क्रिमरोल शिवाय कधीच पूर्ण होणार नाही.आपली प्रतिक्रिया महत्वाची आहे.जरूर द्या.

—- क्रिमरोल —-

भूक
उचंबळून वर यायची
आतडी फाटायची
जीभ सुकायची
लाईफ संघर्षाच्या काळात
करिअर करिअर म्हणायची
तेव्हा,
पोटाला आधार देणारा
कटिंग चहाबरोबर
खिसा सांभाळत हातात यायचास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

दिवसातून एकच भेट
तुझं माहीत नाही
पण मी तरसायचो तुला भेटायला
भुकेचा आणि मेंदूचा
जुगार चाललेला असताना
भूक नेहमी हारायची
तेव्हा तू द्यायचास आधार
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू फार आवडत होतास
असं नाही
पण तू भूक अडवत होतास
काही काळ तरी
तुला बनवणाऱ्या हाताला
मी कायम सलाम करत राहिलो
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

मराठवाड्याचा दुष्काळ
विदर्भाचे दुःख
खान्देशी,माणदेशी,
कोकणी आणि बरंच काही
फक्त तू जवळून पाहिलं
तु प्रत्येकाचा आधार झालास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू हातात आलास की
नेमकं त्याचवेळी आई
फोनवर विचारायची
काही खाल्लं का रे बाळा..?
तेव्हा तुला अख्खा तोंडात
कोंबून बोबडे बोल बोलायचो आईशी
आई जेवतोय नंतर बोलतो.
खरंतर तेव्हा फार जवळचा वाटायचास मला
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

अस्लमला भेटतोस
चंदनशिवेला भेटतोस
भोसलेला भेटतोस
आणि एखाद्या जोशीलासुद्धा
पण तूच एकमेव आहेस
कुणाला नाव,गाव,जात,धर्म
न विचारता आधार देत राहतोस
माझ्या प्रिय मित्रा क्रीमरोल..

तू संपून जाणारा
एक पदार्थ असलास तरीही
तू स्टगलरांचा फार मोठा आधार आहेस
तू मला जी साथ दिलीस
नाद खुळा यार नाद खुळा
पाच रुपयात भूक मारायची
कला तुझ्यात आहे
म्हणूनच
अनेक स्टगलर कलाकारांना
तुझा फार मोठा आधार आहे
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल..

दंगलकार-नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521

Leave a Comment