रामलल्लांच्या मूर्तीचा ‘तो’ व्हायरल फोटो खोटा?? मुख्य पुजाऱ्यांनी केली चौकशीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ तारखेला अयोध्या येथे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात मोठं आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर उदघाटनाला देशातून ८००० हुन अधिक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वच रामभक्त २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वीच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो व्हायरल (Ram Murti Viral Photo) झाला. मात्र हा फोटो खरा कि खोटा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

चेहऱ्यावर गोड हास्य आणि भाळी टिळा असलेल्या रामाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. या फोटो मध्ये प्रभू श्रीरामाचे डोळे उघडे दिसत आहेत. मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हंटल कि, प्राणप्रतिष्ठापूर्वी श्रीरामांचे डोळे उघडता येत नाहीत. जी मूर्ती निवडली जाते त्या मूर्तीचे डोळे झाकलेले असतात. त्यामुळे सध्या मूर्तीचा जो फोटो व्हायरल होत आहे ती खरी मूर्ती नाही. असं असतानाही जर डोळे उघडे असलेल्या मूर्तीचे फोटो व्हायरल होत असतील तर हे फोटो कोणी व्हायरल केले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली आहे.

प्राण प्रतिष्ठापूर्वी पूर्ण शृंगार असेल पण डोळे उघडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्रोच्चार व अनुष्ठानाद्वारे केले जात आहे. दरम्यान, रामललाच्या शरीराचे इतर भाग उघडता येतील पण डोळे उघडले जाणार नाहीत. आज प्राणप्रतिष्ठा विधीचा पाचवा दिवस असून, आजपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे अयोध्येला पोहोचू लागले आहेत. त्यामुळे इथून अयोध्येत फक्त अशा लोकांनाच प्रवेश मिळणार आहे, ज्यांना रामलल्लाच्या अभिषेकाचे निमंत्रण आहे असे सत्येंद्र दास यांनी सांगितलं.