कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात तोतया डाॅक्टरला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे (वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सोमवारी सकाळी एकजण डॉक्टरसारखे पांढरे अ‍ॅपरन व गळ्यात ओळखपत्र घालून फिरत असल्याचे सुरक्षारक्षक श्रावण दणाने यांना दिसले. संबंधिताच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे दणाने यांनी ही बाब लिपिक निलेश माने यांना सांगीतली. निलेश माने यांनी आवारात जाऊन पाहिले असता संबंधित व्यक्ती डॉक्टर असल्याच्या अविर्भावात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्या व्यक्तीच्या गळ्यात महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान असे लिहीलेले ओळखपत्र होते. संशय वाटल्यामुळे लिपिक माने यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता, मी सोनवडी आरोग्य केंद्रात अधिपरिचारक आहे, असे त्याने सांगितले.

संबधित व्यक्तीवर संशय बळावल्याने लिपिक माने यांनी अधिक विचारपूस केली असता. संबंधिताने मी सदरचे ओळखपत्र सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर एका झेरॉक्स सेंटरमधून बोगस तयार करुन घेतल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती तोतया डॉक्टर म्हणून फिरत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लिपिक माने यांनी याबाबतची माहिती वैद्यकीय अधिक्षक आर. जी. शेडगे यांना दिली. तसेच पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन अटक केले. याबाबतचा गुन्हा कराड शहर पोलिसात नोंदविण्यात आला आहे.