Satara News : ढोल ताशांच्या गजरात अन् डीजेच्या ठेक्यात सातारकरांकडून गणरायाला निरोप…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ढोल ताशांच्या गजरात तसेच झांज पथकांच्या गजरामध्ये आणि लेझीम पथकांच्या साक्षीने “गणपती बाप्पा मोरया’ पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांच्या निनादात सातारा जिल्हा वासियांनी गणरायाचे विसर्जन केले. सातारा जिल्ह्यामध्ये असेल्या एकूण 3 हजार 921 सार्वजनिक गणेश मंडळांचे व घरगुती गणपतीचे नदी, कृतीम जलकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी कराड, वाई, फलटण, सातारा, कोरेगांवसह खटाव तालुका गणपती बप्पा मोरया च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

कराड शहरात गुरुवारी मध्यरात्री 3 वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तद्वारे पोलिसांकडून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले.

यावेळी कराड येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणुका तब्बल १९ तास चालल्या. कराड शहरातील कृष्णा- कोयना नदीच्या प्रीतीसंगम घाटावर गणेश भक्तांच्या अलोट गर्दीत 166 मंडळांनी गणपती बाप्पांना निरोप दिला. यावेळी रात्री १२ वाजता सर्व प्रकारची वाद्ये बंद करण्यात आली. त्यामुळे मिरवणुकीत नाचणारे कार्यकर्त्याचा जोष संपला. त्यानंतर मिरवणूक मार्गावरील अनेक मंडळांची वाहने कृष्णा घाटाकडे मार्गस्थ झाली, परंतु प्रत्यक्ष गणेश मूर्तींचे विसर्जन व्हायला पहाटे तीन वाजले.

 

साताऱ्यात खा. उदयनराजेंनी पुन्हा उडवली कॉलर

सातारा शहरात अनंत चतुर्थीला घरगुती गणपती सोबत मंडळाचे गणपतीही विसर्जित करण्यात आले. शहरातील मंडळाच्या मूर्तीची विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होती. छ. उदयनराजे यांनी या मिरवणुका हजेरी लावली अन् पुन्हा एकदा आपली स्टाईल तरूणाईच्या आग्रहाखातर मारली. राजे येताच तरूणाईमध्ये जल्लोष दिसून आला. तरूणांनी ‘मैं हू डाॅन, आले रे आले राजे’ तसेच गणपती बाप्पांची गाणी लावत डान्सचा आग्रह केला. राजेंनी आपल्या खास शैलीत डान्स करत पुन्हा काॅलर उडवली. छत्रपती उदयनराजे यांचा गणपती मिरवणुकीतील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होवू लागला आहे.

कराड तालुक्यात ग्रामीण भागात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

कराड तालुक्यात आलेल्या गावांमध्ये काही ठिकाणी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील सुपणे, किरपे, तांबवे, वसंतगड, साकुर्डी, येणके आदी गावातील ग्रामस्थानी कोयना नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले. यावेळी किरपेत ग्रामपंचायतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी ग्रामस्थांनी गणपती विसर्जनासाठी गणेश मूर्तीसोबत आणलेले निर्माल्य नदीपात्रात न सोडता ते निर्माल्य कुंडात विसर्जित केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची स्वागत कक्षात हजेरी

कराड शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या स्वागतासाठी चावडी चौकात नगरपालिकेच्या स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. विसर्जनासाठी कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या प्रत्येक मंडळाचे नगरपालिकेच्या वतीने श्रीफळ आणि झाडाचे रोप देऊन स्वागत केले जात होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या स्वागत कक्षात हजेरी लावली. पाऊण तास ते स्वागत कक्षात होते. त्यांच्या हस्ते देखील अनेक मंडळांचे स्वागत करण्यात आले.

कराडच्या विसर्जन मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त

कराड येथे गणपती विसर्जन मार्गावर पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर नाका, भेदा चौक, दत्त चौक, आजाद चौक, प्रीतिसंगम घाट आदी ठिकाणी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. कराड येथे पोलिस बंदोबस्तासाठी 18 अधिकारी, 197 अंमलदार आणि 50 होमगार्ड तैनात करण्यात आले होते.

साताऱ्यात गणेश विसर्जनाला वरुणराजाची हजेरी

सातारा शहरात गणपती विसर्जमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान, दुपारी दोन नंतर शहरात पावसाने हजेरी लावली. उभ्या पावसात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे शहरातील कृत्रिम जलकूंड तसेच तलावात विसर्जन केले.

कराडला पालिकेकडून पाणी फवारणी करून रस्त्याची धुलाई

कराड येथे गुरुवारी गणेश विसर्जनामुळे शहरातील मुख्य असलेल्या कोल्हापूर नाक्यापासून ते कृष्णा नदी पर्यंतच्या मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गुलालाची उधळण केली जात होती. त्यामुळे शहरात सर्वत्र गुलाल पसरला होता. या ठिकाणी पालिकेद्वारे तत्काळ पाण्याची फवारणी करण्यात आली. तसेच त्याद्वारे रस्ते चकाचक करण्यात आले.

साताऱ्यात पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांकडून दुचाकीवरून पाहणी

गणपती विसर्जनामुळे सातारा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने या ठिकाणी विसर्जनामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले होते. दरम्यान, संध्याकाळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरात जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समवेत दुचाकी वरून विसर्जन मार्गाची पाहणी केली व विसर्जन तळ्यावर जाऊन तेथे आलेल्या कार्यकर्त्यांची व नागरिकांची विसर्जनाच्या संदर्भातील आणि अडचणींविषयी माहिती घेतली.

साताऱ्यात डिजे वाजवणाऱ्या एका सार्वजनिक मंडळावर कारवाई

सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेची आवाज मर्यादा क्षमतेपेक्षा जास्त आढळल्याने शाहूपुरी पोलीस स्टेशनने एका गणेश मंडळावर व तेथे वाजवण्यात आलेल्या डॉल्बीवर कारवाई केली आहे.