यवतमाळ प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी होत, बैलजोडी विकून शेतकऱ्यांनी शेती केली. मात्र पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवत खराब झालेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.
जांब येथील राम ढोबळे या शेतकऱ्यांकडे पाच एकर शेती आहे. बियाणे विकत घेण्यासाठी त्यांनी बैलजोडी विकली. शेतात राबून पीक वाढविले. मात्र अवकाळी पावसाने स्वप्नांवर नांगर फिरविला. सोयाबिन पीक जागीच सडत असल्याचे बघून शेतकऱ्यांने भाड्याने ट्रॅक्टर आणून पिकावर फिरविला. त्यात इतरही पीक होते. अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
मात्र अजून तलाठी, विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतांकडे फिरकलेच नाही असा आरोप ढोबळे यांनी केला. नुकसान झाल्याने आता शेती करायची इच्छा राहिली नाही. शेतात जाण्याची हिम्मत होत नाही अशी आपबिती या शेतकऱ्याने मांडली. शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तत्काळ सरसकट मदत देण्याची मागणी केली जात आहे.