लाइटच्या डीपीसाठी फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण

औरंगाबाद – काल गंगापूर येथील शेतकऱ्यांनी नादुरूस्त लाइटच्या डीपीवरून महावितरणच्या उप अभियंत्याला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार ताजा असतानाच आज फुलंब्रीतील शेतकऱ्यांनीही याच कारणासाठी आंदोलन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. या कारणामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी गुरुवारी ही कृती केली.

गेल्या काही दिवसांपासून फुलंब्री येथील लाइटची डीपी बंद आहे. ती सुरु करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी केली. मात्र तरीही त्यात दुरुस्ती झाली नसल्याने फुलंब्री येथील शेतकरी आक्रमक झाले. यातील मंगेश साबळे नावाच्या तरुणाने उप अभियंत्याला मारहाण केली. सदर प्रकारानंतर डीपी दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

काल गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभियंत्याला कोंडले –
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही काल याच कारणासाठी आंदोलन केले. येथील शेतकऱ्यांनीदेखील आक्रमक होत उप अभियंत्याशी बाचाबाची केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला केबिनमध्ये कोंडून ठेवले आणि केबिनला टाळे लावले होते.