साताऱ्यातील शेतकऱ्याने केली लालऐवजी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड; आता होतेय बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चवीला गोड, थोडीशी आंबट आणि रंगाने लालबुंद दिसणारी स्ट्रॉबेरी आपल्या सर्वांनाच आवडते. स्ट्रॉबेरी ही नेहमीच लाल रंगाची असते हे आजवर आपण ऐकतही आलो आहोत आणि पाहत ही. परंतु महाराष्ट्रातीलच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अनोख्या पद्धतीने पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी (White Strawberry) उगवली आहे. या स्ट्रॉबेरीला परदेशामध्ये “फ्लोरिडा पर्ल” असे म्हणतात. सातारा जिल्ह्यातील वाईच्या फुले नगरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने ही पांढऱ्या रंगाची स्ट्रॉबेरी उत्पादित केली आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

स्ट्रॉबेरीची किंमत किती?

फुले नगरात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव उमेश खामकर असे आहे. त्यांनी आपल्या अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची बाजारात विक्री देखील सुरू आहे. खास म्हणजे या स्ट्रॉबेरीची किंमत 1000 पासून ते 1500 रुपये किलोपर्यंत आहे. या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सहापट अधिक असल्याने खामकर यांना याचा चांगलाच फायदा होत आहे. आता लवकरच पांढरी स्ट्रॉबेरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील विकण्यासाठी आणली जाईल.

या स्ट्रॉबेरीची खास वैशिष्ट्य कोणती?

या स्ट्रॉबेरीची खास वैशिष्ट्य म्हणजे, हीच स्ट्रॉबेरी लाल स्ट्रॉबेरीच्या तुलनेत जास्त गोड असते. या स्ट्रॉबेरीमध्ये अनेक पोषक तत्वे असल्यामुळे ती खाणे शरीरासाठी चांगली असते. कमी नैसर्गित आम्लतेमुळे पांढरी स्ट्रॉबेरी जास्त लोकप्रिय ठरत आहे. परदेशामध्ये या स्ट्रॉबेरीची जास्त प्रमाणात शेती करण्यात येते.

सर्वात प्रथम अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग करण्यात आला होता. या स्ट्रॉबेरीलाच फ्लोरिडा पर्ल असे म्हटले जाते. भारतामध्ये या स्ट्रॉबेरीचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. या स्ट्रॉबेरीच्या प्रयोगासाठी त्यांनी फ्लोरीडा युनिव्हर्सिटीतून रॉयल्टी राईट्स विकत घेतले आहे. त्यामुळे ज्या कोणाला या स्ट्रॉबेरीची शेती करायची असेल ते शेतकरी खामकर यांच्याकडून हक्क विकत घेऊ शकतात.