शेतकऱ्यांचा वन्य प्राण्यांना कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके 
साताऱ्यातील परळी भागात वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो शेतकरी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. परळी भागात रानडुक्कर गवे व इतर प्राण्यांचा त्रास वाढला आहे या वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होते आहे. याविरोधात हा आक्रोश मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना देण्यात आलं.

वन विभागाच्या हद्दीत कुंपण, संरक्षण भिंत बांधून मिळावी, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे,पाळीव प्राण्यावर हल्ले यातून होणारी नुकसान भरपाई योग्य मिळावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. निसर्गाचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीत जंगलाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वन्य प्राण्यांचा सुळसुळाट सुरु आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे डोंगरकपारीसह दऱ्याखोऱ्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य राजू (भैया) भोसले यांच्या नेतृत्वाखाली परळी भागातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह हजारो शेतकरी महिला, पुरूष सहभागी झाले होते.