हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Agricultural Revolution Scheme) अत्यंत फायदेशीर ठरत आहे. आता याच योजनेअंतर्गत बोअरवेलसाठीही (Borewell) अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी ५०,००० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पाणीटंचाईच्या समस्येमुळे अनेक शेतकरी सिंचनाच्या सुविधांसाठी मोठा खर्च करण्यास भाग पडतात. यामुळेच शासनाने शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन पद्धती, पीव्हीसी पाइपसाठीही अनुदान देण्याची तरतूद केली आहे. मागील पाच वर्षांत शासनाच्या मदतीने हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळाली आहे. आता बोअरवेलचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोण अर्ज करू शकतो?
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा.
- अर्जदाराकडे स्वतःच्या जातीचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांच्या आत असावे.
- त्याच्या नावावर असलेली किमान ०.४० हेक्टर जमीन आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या नावावर असलेला सातबारा आणि आठ-अ उतारा आवश्यक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
जातीचा दाखला
उत्पन्न प्रमाणपत्र
सातबारा आणि आठ-अ उतारा
दारिद्र्यरेषेच्या खालील (BPL) कार्ड
१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
ग्रामसभेचा ठराव
जागेचा फोटो
पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)
५०० फूट अंतरावर कोणतीही विहीर नसल्याचा दाखला
अर्जदाराने हे सर्व कागदपत्रे अर्ज मंजुरीनंतर संबंधित विभागाकडे सादर करावी लागतील.
अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडा.
- ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ निवडून अर्ज भरा.
- सर्व आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराने स्थानिक कृषी सहाय्यक किंवा सीएससी केंद्राशी संपर्क साधावा.