कारवाई करा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमरण उपोषण : जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्याचे निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

जिल्हा रुग्णालयाचा कारभार नेहमीच विविध कारणांना चर्चेत असतो. याठिकाणी येणा-या रुग्णांना वेगवेगळया प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मनमानी, भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराबाबत नेहमीच तक्रारी होत असतात. परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, अन्यथा 29 ऑगस्टपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनाव्दारे दिली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हयाचे सुपुत्र आहेत. त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष व संयमी नेतृत्व असलेल्या त्यांच्या जिल्हयात भ्रष्ट, मनमानी व भोंगळ कारभार करणा-या डॉ. सुभाष चव्हाण यांच्याबाबत अनेक तक्रारी असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आरोग्य सुविधा तळागाळात पोहचवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन अहोरात्र झटते. मात्र भ्रष्ट व राजकीय दबावाचे अधिकारी या सर्व योजना धुळीस मिळवतात. मृत्यूदर, माता बालसंगोपन, एक्सरे मशीन नादुरुस्त असणे, खोटया वैद्यकीय बिलावर सह्या, छोटे मोठे ऑपरेशन, दिव्यांगाचे दाखले, मिटींगच्या नावाखाली फोन न उचलणे, मुंबई व पुणे येथील बैठका याची कारणे देऊन कार्यालयात हजर न राहणे या सर्व गोष्टी चिंतेचा विषय आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही.

सातारा जिल्हयाला 2019 साली मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून तसा शासन निर्णयही झाला आहे. शासन निर्णयानुसार ज्या जिल्हयामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर होऊन ते सुरु होते, त्यावेळेस जिल्हा शल्यचिकित्सक हे पद बरखास्त होते. गेले तीन वर्षे कॉलेज मंजूर होऊन सुरु झाले, तरीही हे पद बरखास्त केले नाही. वास्तविक हे पद बरखास्त होऊन त्याचा चार्ज मेडिकल कॉलेजचे अधिष्ठताकडे देणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासारखे जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित करावेत व या पदाचा चार्ज कॉलेजच्या अधिष्ठतांकडे तात्काळ द्यावा. तसे झाल्यास नागरिकांना वेळेवर आणि चांगल्या सुविधा मिळतील. वैद्यकीय मंडळ स्थापन होईल आणि राजपत्रित अधिका-यांना मुंबई- पुण्याला जावे लागणार नाही. त्याचप्रमाणे 21 कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या महिलांच्या रुग्णालयामध्ये सध्या मेडिकल कॉलेज सुरु आहे. वास्तविक मेडिकल कॉलेजची जागा हस्तांतरित करुन 3 वर्षे झाले. तरी अजून तिथे एकही वीट लागलेली नाही. मेडिकल कॉलेजचे इमारत बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणजे 350 बेड्स उपलब्ध होतील आणि महिला रुग्णालयांचा उपयोग ख-या अर्थाने महिलांसाठी होईल. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा 29 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे (ता. महाबळेश्वर, जि.सातारा) येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही श्री. मोरे यांनी दिला आहे.