मुंबई | इंद्रजीत यादव
अपुऱ्या तांत्रिक सुविधा, परीक्षाकेंद्रावरील प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि उद्धट वर्तन यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या परीक्षेत त्रास सहन करावा लागला. मुंबईतील मीरारोड परिसरातील मॅक आऊटसोर्सिंग रोडजवळ असलेल्या परीक्षा केंद्रात सदर प्रकार घडून आला आहे. महापालिकेच्या नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. वेळेनुसार १२.३० ला सुरु होणारी परिक्षा केंद्राच्या हलगर्जीपणामुळे १ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झाली. विद्यार्थ्यांनी याबाबत केंद्रातील प्रशासकांशी बोलणं केलं असता, “तुम्ही विद्यार्थी आहात, त्याप्रमाणेच वागा. उगीच दंगा कराल तर सरकारी नोकरीला मुकाल” अशी धमकी देण्यात आली. मागे थेट भरतीद्वारे या पदांवर जागा भरल्या जात होत्या. यंदाच्या वर्षीपासून मात्र महापालिकेतील काही पदांसाठी परीक्षा निश्चित करण्यात आली होती. २ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी ही परीक्षा नंतर १९ सप्टेंबरला घेण्यात आली. तरीही हा हलगर्जीपणा सुरुच राहिला. याव्यतिरिक्त नागपूर केंद्रातील १९ तारखेची परीक्षा रद्द करुन ती २१ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
इतर महत्वाचे –
या परिक्षेत विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून, त्यांना योग्य सोयीसुविधा देण्यापर्यंत अनेकदा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या परिक्षेचा बोजवारा उडल्याचं दिसून आलं आहे. तांत्रिकदृष्ट्या अनेक अडचणी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागल्या आहेत. सर्व्हर उपलब्ध नसणे, प्रश्नांची उत्तरे देऊनसुद्धा स्वीकारली न जाणे, संगणक मध्येच बंद होणे अशा त्रासदायक घटना यानिमित्ताने समोर आल्या आहेत. तक्रार कुणाकडे करावी? या द्विधा मनस्थितीत परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी तब्बल २ तास घुटमळत होते. ग्रामीण तसेच शहरी भागातून कष्टपूर्वक या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात पोहचलेल्या परीक्षार्थींना या ढिसाळ कारभाराचा फटका बसला असून या परिस्थितीत संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, महापरीक्षा, आपले सरकार व प्रधानमंत्री यांना पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाचे –