बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचं दिसत आहे. अंबाजोगाई तालुक्यात सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका महिला वकिलेला गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी रिंगण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीचा ‘गुन्हा’?
पीडित महिला वकील यांनी आपल्या घरासमोर सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषणाविरोधात स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्या महिलेला शेतात नेऊन काठ्या व पाईपने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पाईपच्या माराने शरीरावर निळे डाग पडल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर पीडित महिला काही काळ बेशुद्धही पडली होती.
नेत्यांची प्रतिक्रिया आणि संताप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही घटना समाजमाध्यमांवर उघड करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “एका वकील महिलेला १० पुरूषांनी मिळून रिंगण करून मारणं हे कोणत्या गावशाहीचं लक्षण?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाची कारवाई अनिश्चित
घटनेनंतर संबंधित महिला फक्त एका रात्रीत उपचार घेऊन घरी परतवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
बीड जिल्ह्यात वाढती हिंसा चिंतेची बाब
संतोष देशमुख खून प्रकरणानंतर बीड जिल्हा आधीच वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यातच महिला वकिलेसोबत घडलेला प्रकार हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.




