Tuesday, February 7, 2023

काॅलेजच्या युवकांच्यात मलकापूरात मारामारी : 9 जणांवर गुन्हा

- Advertisement -

कराड | मलकापूर (ता. कराड) येथे सरांना नाव का सांगितले असे म्हणून लाकडी दांडके, विटा व हाताने मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर दुर्गेश मोहिते, मारी कुदळे, साहिल कुदळे, आर्यन गंलाडे गणेश कसबे व इतर अनोळखी चार जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर त्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये जयदीप अमृत कदम व अथर्व ढेबे हे दोघेजण जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मलकापूर येथील आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या बाहेरील रस्त्यावर दुर्गेश मोहिते यांनी जयदीप कदम याला तू माझे नाव पाटील सरांना का सांगितले असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या मारी कुदळे, साहिल कुदळे, आर्यन गंलाडे, गणेश कसबे व इतर अनोळखी चार जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून जगदीप कदम व त्याचे मित्र आर्यन पाटील, प्रणव पवार, अथर्व ढेबे यांना हाताने, लाकडी दांडक्याने व विटाने मारहाण केली.

- Advertisement -

यामध्ये जयदीप कदम व अथर्व ढेबे हे दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबतची फिर्याद जयदीप कदम याने शहर पोलिसात दिली असून नऊ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विजय मुळे करत आहेत.