अखेर शिवसागर जलाशयातील बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
बामणोली भागातील म्हावशी येथे पोहताना बुडालेला पर्यटक तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही शोधमोहीम सुरू होती. महाबळेश्वर ट्रेकर्स, आ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि स्थानिक प्रशासन गेली तीन दिवस मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर आज सकाळी बुडालेल्या संकेत संग्राम काळे (वय- 25, रा. वाठार, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. पर्यटकाचा मृतदेह सापडला असून शव विच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर वर्षाअखेरीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कोयना धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पर्यटक बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या घटनेने पर्यटकांत भीती निर्माण झाली आहे. पर्यटक बुडाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संकेत काळे बुडाल्याची माहिती मिळताच ट्रेकर्सच्या टीम व प्रशासन गेल्या तीन दिवसापासून शोधकार्य करत होते. अखेर आज सकाळपासून शोध मोहीमेत संकतेचा मृतदेह सापडला.

संकेत काळे दि. 26 डिसेंबर रोजी आपल्या वीस मित्रासोबत वर्षअखेरीनिमित्त कास- बामणोली परिसरात पर्यटनासाठी गेला होता. यावेळी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात ही दुर्घटना घडली. संकेत पोहण्यासाठी गेला होता की वाॅटर बोट पलटी होवून तो बुडाला यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. संकेत यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तो केपीटी दूध काढणी यंत्र, जखिणवाडी- नांदलापूर येथे काम करत होता. संकेत आई- वडिलांना एकलुता एक मुलगा होता. त्याला एक विवाहित बहिणही आहे. त्याच्या मृत्यूमुळे काळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.