हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा हटवण्यात येणार असल्याच्या चर्चांदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. गुवाहाटी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान पत्रकारांनी २ हजार रूपयांचं नोटांचे सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकानं दिले आहेत का? या प्रश्नावर सीतारामन यांनी खुलासा केला. यावर २ हजार रूपयांचं नोटांचे सर्क्युलेशन रोखण्याचे बँकांना दिले नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. “माझ्या माहितीप्रमाणे बँकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही,” असं त्या म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी इंडियन बँकेने देशभरातील आपल्या ३ हजार एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहक केवळ २ हजार रूपयांचे सुटे करून घेण्यासाठी बँकांमध्ये येत असतात. त्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, असं बँकेककडून सांगण्यात आलं होतं. तसंच एका अहवालात देशातील २ लाख ४० हजार एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेने २ हजार रूपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. त्यानंतर बेहिशोबी रक्कम जमा करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात २ हजार रूपयांचा साठा केला होता. तसंच गेल्या वर्षी संसदेत उत्तर देताना जप्त करण्यात आलेल्या बेहिशोबी रकमेपैकी ४३ टक्के या २ हजार रूपयांच्या नोटा होत्या असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.