राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

राज्य सहकारी बँकेवर सर्वच पक्षांचे सदस्य उपलब्ध आहेत. विधानभवनात १०८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आकडा सहकारमंत्र्यांनी सांगितला होता. १०८८ कोटींचं नियमबाह्य कर्ज देण्यात आल्याचं प्रकरण आहे, ते आम्हाला मान्य आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा विकास व्हावा, कापूस उत्पादकांना मदत मिळावी म्हणूनच आम्ही नियमबाह्य कर्ज दिली होती, आणि त्या कर्जाची परतफेड आता झाली आहे. ४ दिवसांपूर्वी मात्र २५ हजार कोटी रुपयांचा आकडा समोर आणला गेला. ज्या बँकेच्या ठेवी साडेअकराशे ते बाराशे कोटी रुपयांच्या असतील त्यामध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो हा सवालही अजितदादांनी यावेळी उपस्थित केला. राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना आपण केवळ सहकार क्षेत्राच्या विकासासाठीच प्रयत्न केले आहेत. चालू काळात राज्य सरकारने राज्यातील थकबाकी असलेल्या ४ कारखान्यांना अडचणीत असताना नियमबाह्य पद्धतीने पैसे दिले यामध्ये कल्याण काळे, धनंजय महाडिक, विनय कोरे आणि पंकजा मुंडे यांच्या कारखान्यांचा समावेश असल्याचंही पवार पुढे म्हणाले. प्रत्येक चौकशीला गेली अनेक वर्षांपासून सामोरं जात असताना कोर्टाने असे आदेश दिलेच कसे? शरद पवार यांचा या विभागात कुठेही काडीमात्र संबंध नसताना त्यांचं नाव माध्यमावर सारखं सारखं का घेतलं जात होतं हे कळालं नाही. रराज्यातील उपमुख्यमंत्रीपदासारख्या महत्त्वाच्या पदावर पोहचलेलो असताना ज्या माणसानं आपल्याला मोठं केलं त्याची बदनामी होत होती हे मला सहन होत नव्हतं. त्यामुळेच मी एकांतात जाण्याचा निर्णय घेतला असही अजित पवारांनी सांगितलं. ईडीच्या चौकशीसाठी मला येता आलं नव्हतं याच कारण बारामतीमधील पूरपरिस्थिती होती असा निर्वाळाही अजित दादांनी यावेळी दिला.

आमच्या घरात कोणत्याही प्रकारचे गृहकलह नसून माध्यमांनी वारंवार अशाच पद्धतीने पवार कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही आमचं घर शरद पवारांच्या म्हणण्यानुसार चाललेलं असून घरात कोणत्याही प्रकारचे रुसवे-फुगवे नाहीत. पत्रकार परिषद घेताना अजित पवार भावनिक झाले होते. राजकारणातून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नसून तीही एक प्रकारची अफवाच असल्याचं अजित पवार म्हणाले. निवडणूक लढण्यासंदर्भात कोणतंही वक्तव्य अजित पवारांनी केलं नाही. याबाबतीत शरद पवार जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल असंही ते पुढे म्हणाले.

Leave a Comment