हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । थोर समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि स्वातंत्र्यसेनानी क्रांन्तिविरांगना हौसाबाई पाटील यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने पारंपरिक पद्धतीने कोणतेही धार्मिक कर्मकांड किंवा पूजाअर्चा न करता गावातील शाळेला देणगी देण्याचा निर्णय घेत नानांच्या कुटुंबीयांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. हॅलो महाराष्ट्रसोबत बोलताना आजीच्या आठवणी नातू इंद्रजित पाटील यांनी यांनी सांगितल्या.
हौसाबाई या केवळ क्रांन्तिसिंहांच्या मुलगी नव्हत्या तर त्यांनी अगदी लहान वयातच इंग्रजांच्या विरुद्धा तिरंगा हातात घेतला. पुढे सुरलीच्या घाटात ब्रिटीशांच्या गाडीवरती छापा टाकला. वांगी या ठिकाणचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावरती इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून त्यांनी योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजी या ठिकाणी पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्ये होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही हौसाताईंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण मिळाल्यानंतर जिजाऊंसाठी त्या धाऊन आल्या अन् पुरंदरेंचा वैचारिक विरोध दर्शवला.
क्रांन्तिसिंह नाना पाटील यांनी आपल्या आयुष्यात धार्मिक कर्मकांडाला कडाडून विरोध केला. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारुन प्रतिसरकारची स्थापना केली. कम्युनिस्ट पक्षासोबत नानांनी काम केले. आज त्यांचे कुटुंबीयसुद्धा क्रांन्तिसिंहांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहेत. क्रांतिविरांगणा हौसाबाई पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणादिवशी हॅलो महाराष्ट्रसोबत बोलताना इंद्रजीत पाटील भाऊक झाले. आपणच आता पुन्हा बदलाचे वारे बनले पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी हॅलो महाराष्ट्रला दिली.
आज २३ सप्टेंबर आमच्या आज्जी हौसाताई भगवान पाटील यांचा पहिला स्मृतिदिन, यानिमित्ताने आमच्या कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने वर्षश्राद्ध न करता या रूढींना फाटा देण्याचे काम केलं आहे. याच्याआधीही आम्ही दरवेळी विविध अपक्रम घेत असतो ज्यामध्ये जुन्या पारंपरिक रुढीला चिटकून न राहता वास्तविक खऱ्या अर्थाने समाजापुढे ज्या गरजा मांडलेल्या आहेत त्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीने जायचा निर्णय घेतला. आणि गावातील जिल्हा परिषद शाळेला देणगी देण्याचा निर्णय घेतला असे मत इंद्रजित पाटील यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना मांडले.
कोणतेही धार्मिक कर्मकांड, पूजाअर्चा, गावजेवण या सर्व गोष्टी न करता आपण हा निर्णय घेतला आहे. कोणता दिखावा करण्यासाठी आपण हे करत नाही. तसेच आपण एकट्याने करून प्रॉब्लेम सुटत नाही हे सुद्धा आम्हांला मान्य आहे पण त्यासाठी कोणीतरी मळलेली पायवाट सोडून वेगळ्या खडतर मार्गाने जाणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. आज समाजात आपल्याला काही लोक नाव ठेवतील, हे काय असे काहीपण करतात असंही लोक म्हणत असतील पण हे सर्वकाही स्वीकारून, मान्य करून आपण हे सर्व करत आहोत असं त्यांनी म्हंटल.
कोण होत्या हौसाबाई पाटील-
हौसाबाई पाटील या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या.. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी येडेमच्छिंद्र (तालुका वाळवा) येथे झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यादेखील सहभागी झाल्या होत्या. लहानपणीच आईचे छत्र हरपलेल्या हौसाक्कांना आजीने वाढवले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे बाळकडू त्यांना मिळाले. हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंहाच्या सोबत काही काळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. पत्री सरकारला स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड, स्वातंत्र्यसेनानी शाहीर शंकरराव निकम आणि क्रांतीविरांगना हौसाबाई पाटील यांचं भक्कम पाठबळ लाभलं होतं. पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम त्या काळात हौसाबाईंनी केलं होतं. गतवर्षी वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.