GBS Virus: चिंताजनक! पुण्यात जीबीएसमुळे पहिला बळी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
1
GBS Virus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

GBS Virus| पुणे शहरात गुइलेन-बॅरे सिंड्रोम ((GBS Virus) या गंभीर आजाराचा उद्रेक वाढला आहे. या आजारामुळे सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कॅन्सरग्रस्त होती. तीला 15 जानेवारी रोजी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. राज्यात जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू असून, याआधी सोलापुरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुण्यात जीबीएसचे 127 रुग्ण आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या गावांमध्ये या आजाराची वाढती संख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

दरम्यान, जीबीएसच्या प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीमुळे केंद्र सरकारने उपाययोजना राबविण्यात सुरूवात केली आहे. 29 जानेवारी रोजी केंद्राच्या सात सदस्यीय पथकाने पुण्यातील नांदेड गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही), तसेच पुण्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण विभागीय कार्यालयातील तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांनी बाधित भागातील विहिरीतील पाण्याची तपासणी केली.

महत्वाचे म्हणजे, जीबीएसच्या (GBS Virus)रुग्णांसाठी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारात अडचणी येत आहेत.

जीबीएस म्हणजे काय? (GBS Virus)

गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक ऑटोइम्यून आजार आहे. जो व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गानंतर काही आठवड्यांत होतो. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जातंतूंवर हल्ला करते. ज्यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाचे हालचाल करण्याचे नियंत्रणही कमी होते.

तसेच, कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाच्या बॅक्टेरियामुळे हा आजार होऊ शकतो. दूषित अन्न आणि पाण्यामुळे कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग होतो. ज्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये हा संसर्ग मज्जातंतूंवर परिणाम करतो आणि त्यामुळे जीबीएस(GBS Virus) होतो.