पुणे | प्रदीप देशमुख
आपल्या एकमेकांप्रति असलेल्या प्रेमाला योग्य न्याय देण्याची इच्छा असणाऱ्या समीर समुद्र व अमित गोखले या समलिंगी पुरुष जोडप्याने मागील वर्षी सर्वांचा विरोध पत्करत देशाबाहेर जाऊन लग्न केलं. अमेरिकेत त्यांनी हे लग्न केलं होतं. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकाना मूलभूत अधिकार दिल्यानंतर त्यांच्या लग्नाची ही गोष्ट समोर आली आहे.
दोघेही व्यवसायाने अभियंता असून त्यांनी व्यवस्थापनशास्त्रातील पदवीही घेतली आहे. मागील १५ वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. कुटुंब, नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्याकडून तीव्र स्वरुपाच्या विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. “आम्ही जसे आहोत तसे आहोत, आमची काळजी समाजाने करण्याची गरज नाही. लोक काय म्हणतात यापेक्षा आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं ते महत्वाचं आहे.” असंही दोघे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जवळपास दोघांच्याही डोळ्यांत १५ मिनिटे अश्रू तरळत होते. या निर्णयाबद्दल जंगी पार्टी करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.