पहिले ऑलम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यावर लवकरच चित्रपट : नागराज मंजुळेची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
देशाला कुस्तीत वैयक्तिक खेळात पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे कराडचे सुपुत्र जागतिक दर्जाचे पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनणार आहे. पहिले ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव हे आजही पद्मश्री पुरस्कारपासून अद्याप वंचित आहेत. ऑलम्पिकपेक्षा दुसरे मोठं काय असू शकतं. खाशाबा यांनी जगात भारत देशासह महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर जिल्ह्यात करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी केले. त्यामुळे आता 1952 साली कुस्ती आणि खाशाबा जाधवाचा जीवनपट लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे.

उमळवाड (ता. शिरोळ) येथे यात्रेत आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदान भरविले होते. यावेळी नागराज मंजुळे बोलत होते. आ. डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर तसेच मुख्यमंत्री सहाय्यत निधी कक्ष प्रमुख चिवटे उपस्थित होते. यावेळी साताराच्या निखिल माने या चिमुकल्याने चटकदार कुस्ती केल्याने सर्वजण भारावून गेले. तर कुस्त्यांचे नियोजन महाराष्ट्र चॅम्पियन युवराज काकडे, पै. नितीन पाटील यांचेसह दानलिंग उत्सव मंडळांनी केले होते. यावेळी ग्रामस्थ व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील एक पुस्तक आहे. त्याच्या सध्या जी आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याच्यावर गेल्या काही महिन्यापूर्वीच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर निर्माते नागराज मंजुळे हे चित्रपट बनवणार असल्याचे लिहिले आहे. केवळ तो केव्हा बनविला जाईल, याबाबत निश्चितता नव्हती. परंतु आता नागराज मंजुळे यांनी स्वतः जाहीर केल्याने लवकरच कुस्ती, ऑलम्पिक स्पर्धा आणि खाशाबा जाधव यांचा खडतर प्रवास समोर येणार आहे.

खाशाबा जाधव कोण
भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर गावचे सुपुत्र पै. खाशाबा दादासाहेब जाधव असे त्यांचे पूर्ण नाव आहे. खाशाबा जाधव यांच्या कुटुंबातील भावंडे, त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे स्वत: एक नामांकित पैलवान होते. त्यांचे शालेय शिक्षण टिळक हायस्कूल, कराड येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज,कोल्हापूर येथे झाले. पै. खाशाबा जाधव हे 1948 साली ऑलिम्पिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर पोहचणारे पहिले भारतीय होते. तर पुढे 1952 साली त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत 52 किलो वजनगटात कांस्यपदक पटकावणारे पहिले भारतीय होते. भारताचे हे ऑलिंपिकमधील पहिले वैयक्तिक पदक होते. त्यांनी पोलिस खात्यात डीवायसएपी पदावरही काम केले आहे.