हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Flipkart Loan। प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या फ्लिपकार्ट वरून तुम्ही आत्तापर्यंत अनेक वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या असतील. दर्जेदार वस्तू, चांगली सेवा आणि बंपर डिस्काउंट ऑफर्स यामुळे फ्लिपकार्टचा ग्राहक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता तर फक्त ऑनलाईन वस्तूच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने कर्जही तुम्हाला फ्लिपकार्ट वरून मिळू शकतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून फ्लिपकार्टला नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) परवाना मिळाला आहे. त्यामुळे फ्लिपकार्टचा व्यवसाय आणखी वाढण्यास मदत होईल आणि ग्राहक तसेच विक्रेत्यांना सुद्धा घरबसल्या कर्ज मिळेल.
फ्लिपकार्टने २०२२ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला. अमेरिकन रिटेल दिग्गज वॉलमार्टचा फ्लिपकार्टमध्ये ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. बहुतेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सध्या बँका आणि NBFC सोबत भागीदारीत कर्ज देतात. आता आरबीआयनेच फ्लिपकार्टला कर्ज देण्याचे लायसन्स दिल्याने आता आरामात तुम्हीही फ्लिपकार्ट वरून कर्ज घेऊ शकता. रिजर्व बँक ऑफ इंडियाने १३ मार्च रोजी फ्लिपकार्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडला नोंदणी प्रमाणपत्र जारी केले होते. फ्लिपकार्ट आधीच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘बाय नाऊ, पे लेटर’ (BNPL) आणि थर्ड पार्टी वित्तीय संस्थांद्वारे EMI सारख्या सुविधा देते. आता NBFC परवान्यासह फ्लिपकार्ट कोणत्याही थर्ड पार्टी संस्थेवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे कर्ज देण्याची सुविधा (Flipkart Loan) सुरू करू शकते.
हे पण वाचा : गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार; RBI कडून रेपो रेटमध्ये कपात
फ्लिपकार्टच्या विक्रीतही फरक पडेल-
या परवान्याद्वारे फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि सोप्प्या पद्धतीने कर्ज देईल. यामुळे फ्लिपकार्ट वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल आणि फ्लिपकार्टच्या विक्रीतही फरक पडेल. तसेच फ्लिपकार्टवर लिस्टेड असलेल्या लाखो लघु आणि मध्यम विक्रेत्यांचा व्यवसाय मजबूत होईल. त्यांना आणखी वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज मिळेल.
कधीपासून मिळणार कर्ज? Flipkart Loan
फ्लिपकार्ट त्यांची कर्ज योजना (Flipkart Loan) कधीपासून सुरु करेल याबाबत अजून स्पष्टता समोर आलेली नाही. परंतु येत्या काही महिन्यात हि कर्ज प्रक्रिया सुरु होऊ शकते असं बोललं जातंय. अनेक अंतर्गत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल जसे कि प्रमुख व्यवस्थापन कर्मचारी आणि बोर्ड सदस्यांची नियुक्ती आणि व्यवसाय योजनांना अंतिम स्वरूप देणे. फ्लिपकार्टने त्यांच्या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि फिनटेक अॅप super.money द्वारे ग्राहकांना थेट कर्ज देण्याची योजना आखली असल्याचं बोललं जातंय. तसेच कंपनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या विक्रेत्यांना वित्तपुरवठा सुविधा देखील देऊ शकते. सध्या फ्लिपकार्ट आयडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि क्रेडिट सायसन सारख्या कर्जदात्यांसह भागीदारीद्वारे ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देते.




