नाशिक प्रतिनिधी । भिकन शेख
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजित, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दिघोळे सन १९८५ ते १९९९ पर्यंत सलग १५ वर्ष आमदार राहिले. युतीच्या काळात म्हणजे १९९५ ते १९९९ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. ऊर्जा, ग्राम विकास मंत्री, जिल्हा बँकेचे माजी संचालक,राज्य सहकारी बँकेचे विभागीय चेअरमन म्हणून त्यांनी अनेक दिवस काम केले.
या व्यतिरिक्त दिघोळे यांनी आपल्या हयातीत राज्यमंत्री, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद, नाशिक साखर कारखान्याचे चेअरमनपद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या.