माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी रात्री माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे निधन झाले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ढाकणे निमोनिया आजारावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली. शनिवारी 2 वाजता बबनराव ढाकणे यांच्यावर पागोरी पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एक संघर्षशील नेता अशी बबनराव ढाकणे यांची ओळख होती. त्यांनी 1951 चा सालात थेट दिलेल्या जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन होते, ज्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहात देखील भाग घेतला होता. मात्र त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात बाजार समितीपासून झाली. राजकीय कारकीर्द ढाकणे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा प्रवास केला.

इतकेच नव्हे तर, त्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडल्या. यासोबतच ते पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री पदावर देखील होते. त्यांनी जनता दल, जनता पार्टी, काँग्रेस, शेतकरी विचार दल , राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक पक्षांमध्ये काम केले. ज्यामुळे त्यांची राजकिय वर्तुळात एक वेगळी छाप होती. आज त्यांच्या जाण्याने राजकिय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

उद्या होणार अंत्यसंस्कार

बबनराव ढाकणे यांच्यावर उद्या म्हणजे शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर आज बबनराव ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाथर्डीच्या हिंदसेव वसतिगृहामध्ये दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवले जाईल.