औरंगाबाद : उस्मानपुऱ्यात वृद्धेचे तीन तोळ्याचे गंठण हिसकावल्याची घटना ताजी असतानाच सिडकोत एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरांनी अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. ही घटना सिडको एन-८ भागातील नवभारत सोसायटीत दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
विमल दत्तात्रय वाणी (७०, रा. नवभारत कॉलनी, सिडको, एन-८) या दुपारी सव्वा एकच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे पलटवण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी तिथे दोन दुचाकीस्वार आले. त्यांनी दुचाकी घराच्या बाजूला रस्त्यावर उभी केली. त्यातील एकजण विमलबाई यांच्याकडे आला. त्याने त्यांच्या हातात एक चिठ्ठी देत यावरील पत्ता सांगा असे म्हणाला. त्यामुळे विमलबाई यांनी त्यांचा नातू सुयश याला आवाज दिला. तेवढ्यात त्या चोराने विमलबाई यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. दोन्ही चोरटे दुचाकीने तेथून पसार झाले.
यावेळी विमलबाई यांनी आरओरड करत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत दुचाकीस्वार चोर तेथून पसार झाले होते. यांनतर घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी पथकासह घटनासथळाकडे धाव घेतली. गुन्हे शाखेचे पथक देखील तिथे पोहोचले. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात अली. त्यात घटनास्थळाजवळच एका सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहे. पोलिसांची पथके चोरांचा शोध घेत आहेत.
अगोदर केली रेकी मग मारला डल्ला…
विमलबाई यांच्या घराच्या गल्लीतून दुचाकीस्वार चोरांनी अगोदर एक चक्कर मारून रेकी केली. रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून पुन्हा दोन मिनिटात विमलबाई यांच्या घराकडे परत आले. त्यानंतर पत्ता विचारण्याच्या वाहण्याने गंठण हिसकावून धूम ठोकली. चोरटे बाजूच्या एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे.