हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात ने-आण करण्यासाठी मोफत सीएनजी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू असेल. सीएनजी बस रोज विद्यार्थी आणि नागरिकांना त्यांच्या स्थानकापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठाच्या परिसरात बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक, नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु आता सीएनजी बस सेवा सुरू करण्यात आल्यामुळे त्यांच्या या अडचणी दूर होणार आहेत.
विद्यापीठाच्या परिसरात सीएनजी बस सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या सेवेमध्ये विद्यापीठातर्फे ने आण करण्यासाठी दोन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस मुख्य स्थानकापासून सर्व प्रमुख विभाग आणि कार्यालयांसमोर एकूण 13 थांबे घेत नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची ने आण करेल. पुढे जाऊन या बसला कसा प्रतिसाद मिळतो यामुळे तिथे थांबे देखील वाढवण्यात येतील.
कोणते थांबे असणार
विद्यापीठाच्या परिसरात सुरू करण्यात आलेली बस दर अर्ध्या तासाने धावणार आहे. या बसचे थांबे पुढीलप्रमाणे असतील. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयकर ग्रंथालय, रसायनशास्त्र विभाग, परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतिगृह, आरोग्य केंद्र, पुम्बा, मुलांचे वसतिगृह, मुख्य प्रवेशद्वार.
दरम्यान, सीएनजी बसची माहिती देत “बससेवेचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल” असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी म्हटले आहे.