मतदान करा अन् 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुणे तिथे काय उणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha 2024) सुरु असून आत्तापर्यंत २ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाचा टक्का थोडाफार घसरलेला आहे हि चिंतेची बाब म्हणावी आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आव्हान सर्वच स्तरावरून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने अनोखा उपक्रम सुरु केला आहे.यंदा जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनकडून (Pune Petrol Dealers Association) नागरिकांनी मतदान केल्यानंतर ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेअंतर्गत मतदान करुन एक लिटर ऑईल खरेदी करणाऱ्यास ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मतदार जागृतीसाठी उपक्रम राबविण्याचे आम्हाला आवाहन केले होते. त्यानुसार ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. पुण्यातील पेट्रोल पंपचालक मतदान करणाऱ्या नागरिकांनी बोटावरील शाई दाखविल्यानंतर एक लिटर ऑईल खरेदीवर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देणार आहेत. पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान असून ही मोहीम २० मेपर्यंत सुरू असणार आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल डिलर्स असोसिएशन फक्त मोफत पेट्रोल देऊन थांबणार नाही. तर घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत करणार आहे. याचबरोबर मतदानादिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना २० हजार पाण्याच्या बाटल्या वितरित केल्या जाणार आहेत, असेही रुपारेल यांनी सांगितले. ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेसाठी मोबाईल उपयोजन आणि http://www.votekarpunekar.com ही वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्यावरून मतदार आपले मतदान केंद्र शोधू शकतील. तसेच क्यूआर कोड स्कॅन करूनही मतदार मतदान केंद्राचा शोध घेऊ शकतील.