हे तर गलिच्छ राजकारण; पण मी संयम बाळगलाय – आदित्य ठाकरे 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आले आहे. या प्रकरणात आता शिवसेना पक्षाचे नाव घेतले जात आहे त्याबरोबरच आदित्य ठाकरे यांचेही नाव या प्रकरणात पुढे आले आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारचे यश आणि लोकप्रियता खुपत असल्याने हे  राजकारण केले जात असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून हे तर गलिच्छ राजकारण असल्याचे म्हंटले आहे. सोबत मी संयम बाळगला आहे असे ते म्हणाले आहेत. 

सध्या कोरोनाचे संकट ओढावलेले असताना इतर राज्यांसोबत महाराष्ट्र राज्यसरकारही शर्थीचे प्रयत्न करते आहे. या प्रकरणात नाहक ठाकरे कुटुंबावर चिखलफेक केली जात असून माझा व्यक्तिशः या आत्महत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे त्यांनी म्हंटले आहे. वैफल्यातून उमटलेली ही राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरचे लोणीसुद्धा खाण्याचा हा प्रकार म्हणजे माणुसकीला कलंकित करणारा आहे. बॉलिवूड हे मुंबईचे एक अविभाज्य अंग असून तेथील अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.  आणि त्यात काही गुन्हा नाही आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

ज्या लोकांचा कायद्यावर विश्वास नाही तर जागतिक ख्याती असणाऱ्या मुंबई पोलिसांवर संशय घेत आहेत. कुणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती नक्कीच पोलिसांना दिली पाहिजे. मात्र ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा जो प्रयत्न सुरु आहे तो यशस्वी होणार नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून शिवसेनेच्या, महाराष्ट्राच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही अशी कबुली त्यांनी या जाहीरनाम्यात दिली आहे.

Leave a Comment