‘तोंड लपवायची वेळ आल्यानं नितीन राऊत चुकीची आकडेवारी सांगतायेत’; फडणवीसांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची वेळ आल्यानं ते चुकीची आकडेवारी सांगत आहेत”, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis Criticize On Energy Minister Nitin Raut On Light Bill Issue)

आमचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात स्टेट युटिलिटी मजबूत झाली. त्याच्या आधी परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात त्याची परिस्थिती काय होती, याची आकडेवारी बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली आहे. आपलं अपयश लपवण्याकरिता कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, तर कधी गेल्या सरकारकडे बोट दाखवायचं. तुमच्यात ताकद आणि शक्ती असेल तर वीजबिल माफीची घोषणा करा, नाहीतर घोषणा करू नका, असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं आहे.

या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटनंतर वीजबिलात सूट देण्याचा निर्णय घेतला, असं मंत्र्यांनी सांगितलं आणि स्वत:ची होर्डिंग्ज लावून घेतली. बावनकुळे यांच्या काळात वीज विभाग मजबूत झाला. आम्ही वीजबिलं दाखवून लोकांचे झालेले हालही दाखवले. नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे, असं टीकास्त्र फडणवीसांनी नितीन राऊतांवर सोडलं आहे.

तत्पूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊतांनीही तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले होते. कोरोना काळात वीजबिले भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये 59,102 कोटींवर पोहोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोहोचली. वाणिज्य ग्राहकांची 879 वरून 1241 कोटींवर तर औद्योगिक ची 472 वरून 982 कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीजबिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली, असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत सांगितलं होतं. त्यावरच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे.

विशेष म्हणजे कालच ऊर्जामंंत्र्यांनी सर्वसामान्यांना वीजबिल माफी मिळणार नसल्याचं सांगितलं होतं. “लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही”, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. तुम्ही जसे ग्राहक आहात तसं आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हाला सुद्धा विजेचं बिल द्यावं लागतं. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरू आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे, त्यांना बिल भरावं लागेल, असं नितीन राऊत म्हणाले होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment