खडसेंच्या बालेकिल्ल्यात वाजतोय घड्याळाचा गजर; राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सोशल मीडियावर फिरते ‘ही’ पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणत पक्ष नैतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. येत्या 17 तारखेला  म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. (Eknath Khadse buzz on Social Media)

एकनाथ खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे संभ्रमात पडलेले कार्यकर्ते खडसे यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे याच कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. सोशल मीडियावर ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’ असा मजकूर असलेल्या अनेक पोस्ट फिरत आहेत. उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तार आणि भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंसारख्या नेत्याची गरज आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळेल आणि मुक्ताईनगरला पुन्हा एकदा लाल दिवा मिळेल, अशी आशा नागरिकांना आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या कोट्यातील विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त एका जागेवर एकनाथ खडसे यांची वर्णी लागू शकते. त्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे शिफारस केली जाईल. खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग येईल. तसेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला महाविकासआघाडीत कोणती जबाबदारी द्यायची, याबाबतही सध्या विचार सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. हे खाते सध्या शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या रुपाने कृषीमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेल्यास शिवसेनेला गृहमंत्रीपद देऊन त्याची भरपाई केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment