‘एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील’- निलेश राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजतेय. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, असा टोला भाजपाचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ”जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. तसेच एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील,” अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी संवाद साधल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र, उर्मिला मातोंडकर यांचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यानं उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. याशिवाय त्या कला क्षेत्रातून असल्यानं राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य उमेदवार आहेत.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणुकही लढवली. मात्र भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र आपल्याला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचं कळतं. मात्र तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं समजतं.

राज्यपाल नियुक्त जागेसाठी हे आहेत निकष
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल त्या नावांना आडकाठी करू शकतात किंवा ही नावं फेटाळली जाऊ शकतात. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे संबंधही तसे फारसे सलोख्याचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment