‘उद्धवजी राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा!’ देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या संबंधित भागातील शेतक-यांना तातडीने मदत करा तसंच ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. फडणवीसांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणं गरजेचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केलंय.

“गेल्या 3 ते 4 दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. तो मदतीसाछी आर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून वेदना होतात. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फूटत नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत यापलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामे देखील होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. आज अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे”, अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Devendra fadanvis letter To Cm Uddhav Thackeray over Wet drought)

“पीक काढणीचं काम सुरु असताना तुफान पाऊस झालाय. शेतकऱ्यांचा लागवड खर्चही आता निघणार नाही. वाहिन्यांवर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे. मदतीसाठी तो आर्जव करीत आहे पण त्याला जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे कसे”, असा शेतकऱ्यापुढे प्रश्न असल्याचं फडणवीस म्हणाले. सातत्याने विनंती करुनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर 25 ते 50 हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरुन तर शेतकऱ्यांना आणखीनच वेदना होतायत. मराठवाड्यातला प्रश्न फारच गंभीर आहे. तेथे तातडीने मदत पोहचणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले.

“आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आतातरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुकसानीची व्यापकता आणि सर्वत्र झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment