औरंगाबाद : रुग्णालयात काम करणाऱ्या मैत्रिणीला कामावरून काढून टाकल्यामुळे तिच्या मित्राने साथीदाराच्या मदतीने एका परिचारीकेची दुचाकी जाळल्याची घटना पडेगाव भागात घडली. पवन भीमराव मोकळे (रा.आंबेडकर नगर, एन-2 सिडको),करण बबन कदम आणि इतर दोन अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, ज्योती प्रदीप चौधरी वय-34 (रा.नंदनवन कॉलोनी भुजबळनगर) या पडेगाव येथील ईश्वर रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका तरुणीला प्रशासनाने कामावरून कमी केले होते. परंतु त्या तरुणीच्या मित्राला असा संशय होता की, चौधरी यांच्या सांगण्यावरून तिला कामावरून काढले आहे. हा राग मनात धरूनच पवन आणि करण याने त्याच्या तीन मित्रासह 22 मे रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास रुग्णालय जवळ लावलेली (एम.एच.20 एफ.जे.5936) या क्रमांकाची मोपेड दुचाकी जाळली होती.
यानंतर सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार रेकॉर्ड झाल्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे कबुल केले होते. परंतु नंतर त्यांनी टाळाटाळ केल्यामुळे चौधरी यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.