शिवाजी महाराज ते शाहू महाराज… कोल्हापूरच्या गादीचा इतिहास काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. कोल्हापूरात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांनी केलेलं हे स्टेटमेंट… चंदगढ तालुक्यातल्या भर सभेत प्रचार करताना त्यांनी कोल्हापुरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपतींच्या वारस असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असं म्हणणाऱ्या मंडलिकांना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून शाहू छत्रपतींना कोंडीत पकडण्याचा तसा फुल अधिकार आहे. पण असं करताना इतिहासाची कोणतिही उजळणी न करता केलेल्या या वक्तव्यानं मंडलिकांवरच गेम उलटा झालाय. वाद होणार हे माहीत असूनही काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या वारसाची गोष्ट मंडलिकांनी कशाच्या बेसिसवर बोलून दाखवलीय? मंडलिकांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेक वाद कसे निर्माण होऊ शकतात? ज्या गादीनं सबंध महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा दिला त्या कोल्हापूरच्या गादीचा नेमका इतिहास काय? शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू आणि राजर्षी शाहू ते आत्ताचे शाहू याच सगळ्याची नव्याने उजळणी आज जाणून घेऊयात ..

तारीख 6 जून. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी संबंध महाराष्ट्रात चैतन्याचं वातावरण पसरलं होतं. पुरोगामी वारशाचा इतिहास सांगणाऱ्या कोल्हापुराला मात्र याच दिवशी दंगलीचा डाग लागला. अवघा कोल्हापूर जिल्हा भयभीत झाला असताना करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी रस्त्यावर उतरत कोल्हापूरला नख लावू देणार नाही, असा दंगेखोरांना इशारा देत कोल्हापूरचं वातावरण शांत केलं. राजर्षी शाहू छत्रपतींच्या गादीला शोभेल असं काम सध्याच्या शाहू महाराज आणि राजर्षी शाहू यांच्यात एक समान धागा होता. तो म्हणजे पुरोगामी विचारांचा. कोल्हापुरात आपला जम बसवण्यासाठी भाजप मागच्या अनेक वर्षांपासून नेटानं कामाला लागलंय. भाजपला आपले पाय कोल्हापूरच्या लाल मातीत घट्ट रोवायचे असतील तर प्रथम इथल्या मातीतला पुरोगामी विचार धुवून काढणं गरजेचं आहे. अन याचाच एक पार्ट म्हणून भाजपच्या नेत्यांकडून अशा प्रकारची विधानं केली जातायत. कोल्हापूरातला पुरोगामी विचार मुळासकट उपटायचा असेल तर त्याच मूळ असलेल्या छत्रपती घराण्याच्या वारसावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचा असा कुटील डाव भाजप करतंय असं बोललं जात आहे. आता मांडलिकांच्या या विधानात किती तथ्य आहे? काय खरं अन काय खोट हे पाहण्यापूर्वी आपण पहिल्यांदा शिवाजी महाराज ते राजर्शी शाहू हा इतिहास जाणून घेऊयात.

Shivaji Maharaj ते Shahu Maharaj क्रोनॉलॉजी नक्की कशी? Kolhapur गादीचा इतिहास काय?

रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना पत्नी सईबाईंकडून संभाजी तर पत्नी सोयराबाई यांच्याकडून राजाराम असे दोन पुत्र. १६८० साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यांनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले. पुढे १६८९ मध्ये संभाजीमहाराजांचा औरंगजेबाच्या कैदेत मृत्यू झाला. संभाजीराजेंचे पुत्र शाहू ला देखील औरंगजेबाने कैदेत ठेवलं होतं. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज गादीवर आले. १७०० साली वय ३० असताना सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. नंतर राजाराम महाराजांच्या पत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची मुलगी महाराणी ताराबाई यांनी आपला मुलगा शिवाजी दुसरे यांना गादीवर बसवून राज्यकारभार सुरू केला. १७०७ ला औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांची सुटका झाली. राजगादीवरून ताराराणी आणि शाहू यांच्यात वाद सुरु झाला. काही दिवसांनी 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. तिकडे १७१० साली महाराणी ताराबाई यांनी पन्हाळ्यावर कोल्हापूर राज्याचा पाया रचला आणि स्वतंत्र राज्याची निर्मिती करत शिवाजी दुसरे यांना गादीवर बसवलं. 1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांनी अचानक ताराराणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला. ताराराणी आणि शिवाजी (दुसरे) यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेतच शिवाजी यांचा 1727 साली मृत्यू झाला. ताराराणी साताऱ्याला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या. 1731 साली शाहू महाराज आणि कोल्हापूर (पन्हाळा)चे संभाजी (दुसरे) यांच्यामध्ये वारणेचा तह झाला. वारणा नदीच्या उत्तरेस शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या. यात संभाजीराजे (दुसरे) कोल्हापूरचा कारभार पाहात होते. संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी यांना दत्तक घेतले होते. नंतर 1838 पर्यंत संभाजी व शहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली. नंतर शहाजी यांचे पुत्र शिवाजी (तिसरे) यांनी 1866 पर्यंत राज्यकारभार केला. पुढे शिवाजी तिसरे यांना कोणी वारस नसल्याने सरदार पाटणकर घराण्यातील नागोजीराव नावाच्या मुलाला दत्तक घेऊन राजाराम असं नामकरण करण्यात आलं. १८८३ साली राजाराम यांचा मृत्यूवेळी राजाराम यांनाही पुत्र नसल्यामुळे शिवाजी (चौथे) यांना दत्तक घेण्यात आले. शिवाजी चौथे यांच्यानंतर आले ते राजर्षी शाहू.

आता बोलूयात राजर्षी शाहू महाराजांबद्दल…

इंग्रज सरकारच्या राजवटीचा तो काळ. करवीर संस्थानावरही इंग्रजांचा कब्जा होता. चौथ्या शिवाजी महाराजांना इंग्रज स्वतंत्रपणे कारभार करू देत नव्हते. माधवराव बर्वे हा संस्थानचा त्या वेळी ‘दिवाण’ होता. महाराजांच्या अडचणी कशा वाढतील, यासाठी जणू हा बर्वे काम करायचा. मात्र छत्रपतींच्या घराण्याचे वंशज म्हणून करवीरच्या या गादीबद्दल लोकांच्या मनात नितांत आदर होता. हीच मेख इंग्रजांना करवीर संस्थान खालसा करण्यात अडचणीची ठरत होती. दिवाण असणाऱ्या बर्वेने मात्र आपलं पातकी धोरण कायम ठेवलं आणि चौथे शिवाजी महाराज मनोरुग्ण असल्याचे इंग्रजांना सांगितलं. मतलबी इंग्रजांनी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि चौथ्या शिवाजी महाराजांना अटक करून त्यांना अहमदनगर येथील किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. अहमदनगर येथील किल्ल्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी चौथ्या शिवाजी महाराजांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यातच एकदा एका मग्रुर इंग्रज अधिकाऱ्याबरोबर झालेल्या झटापटीत चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यावेळी महाराजांचे वय केवळ 21 होते.

या दुर्दैवी घटनेनंतर करवीरचं राजसिंहासन पोरकं झालं. एकीकडे शोक आणि दुसरीकडे इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनांत प्रचंड असंतोष आणि राग उफाळून येऊ लागला. करवीर संस्थानही खालसा होणार? अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे लोकभावना ध्यानात घेऊन आबासाहेबांनी इंग्रजांशी बोलणी केली. आनंदीबाईंचे आणि राजपरिवाराचे त्यांनी सांत्वन करत करवीर संस्थानसाठी दत्तक वारस मंजूर व्हावा म्हणून त्यांना इंग्रज सरकारकडे अर्ज करण्यास सुचविले. अशातच कोल्हापूर संस्थानचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचे थोरले चिरंजीव यशवंतराव यांना दत्तक घेण्याची संमती द्यावी, म्हणून मुंबईच्या गव्हर्नराकडे अर्ज केला. आबासाहेब हे तर कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार होते. शिवाय ते शिवछत्रपतींच्या रक्ताच्या नातेसंबंधातीलही होते.

यशवंतराव त्या वेळी वयाने दहा वर्षांचे आणि थोरले होते. तब्येतीने जसे ते धट्टाकट्टे होते, तसेच बुद्धीनेही तल्लख होते. साहजिकच करवीर संस्थानचा दत्तक वारस म्हणून आनंदीबाई आणि राजपरिवारातील इतर सदस्यांनी यशवंतरावांची एकमताने निवड केली. मग यशवंतरावांना विधिवत दत्तक घेतले. शास्त्रोक्त पद्धतीने केलेला तो दत्तक विधी समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. तो दिवस होता 17 मार्च 1884. या समारंभात यशवंतरावांची करवीर संस्थानचे राजे म्हणून घोषणा करण्यात आली आणि त्यांचे नाव ठेवण्यात आले ‘शाहू छत्रपती’.

यानंतर कोणतही हत्यार हाती न घेता सामाजिक क्रांती कशी करून दाखवायची? याचा आदर्श वस्तूपाठच शाहू महाराजांनी घालून दिला. शोषित वंचित समाजासाठी झटणाऱ्या आणि समतेचं तत्व महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या याच राजाला ‘राजर्षी’ म्हणून लोकमान्यता मिळाली. महाराजांवर लोक प्रेम करू लागले हा प्रेमाचा झरा आजही चिरंतर वाहत आहे. छत्रपतींचा वारसा म्हणून ज्या कोल्हापूरला ओळख होती त्याच कोल्हापूरला पुरोगामी वारश्याचीही जोड मिळाली. आणि हे सर्व घडलं ते राजर्षी शाहू महाराजांमुळे…

आता राजर्षी शाहू ते सध्याचे शाहू छत्रपती हि क्रोनोलॉजि समजून घेऊयात

राजर्षी शाहू महाराजांना प्रिन्स शिवाजी आणि राजाराम तिसरे असे दोन पुत्र होते. यातील प्रिन्स शिवाजी यांचा शिकारी दरम्यान मृत्यू झाला तर राजाराम तिसरे यांनी कोल्हापुरवर २० वर्ष राज्य केलं. राजाराम यांना अपत्य नसल्याने १९४० साली त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी ताराराणी यांनी सातारच्या गादीवरून एक मुलगा दत्तक घेतला ज्याचं नाव ठेवलं सातवा शिवाजी. यावेळी राजाराम तिसरे यांची एकुलती एक मुलगी प्रिन्सेस पद्माराजे ज्यांचा विवाह तेरखेडा येथील जहागीरदार यांच्यासोबत झाला होता त्यांच्या मुलाला कोल्हापूर गादीसाठी दत्तक घ्यावे असा अनेकांचा आग्रह होता. हे दत्तक प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं. कोल्हापुरात कधी नव्हे ती आंदोलनाची राळ उठली होती. मात्र ताराराणी यांनी सातारच्या गादीवरून शिवाजी सातवा यांना दत्तक घेत गादीवर बसवलं आणि स्वतः रिजंट म्हणून काम करायला सुरवात केली. मात्र चारच वर्षांत सातवा शिवाजीचं निधन झालं. आता कोल्हापूरच्या गादीला कोणाला वारस घ्यायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शहाजी दुसरे म्हणजेच सध्याच्या शाहू छत्रपती यांचे वडील यांना देवास सिनिअर गादीकडून दत्तक घेण्यात आलं. शहाजी दुसरे यांचं मूळ नाव विक्रमसिंग पवार. विक्रमसिंग हे देवास सिनियर गादीचे महाराज होते. राजर्शी शाहू महाराजांनी आपली मुलगी अक्कासाहेब यांचा विवाह तुकोजीराव महाराजांसोबत केला होता. या तुकोजींचा मुलगा म्हणजेच विक्रमसिंग पवार. म्हणजेच शहाजी दुसरे हे राजर्षी शाहूं यांचे नातू होते.

शहाजी दुसरे यांनी कोल्हापुरवर राज्य केलं. शहाजी यांचा एकुलता एक मुलगा देवासच्या गादीवर असल्याने आपल्यानंतर आता कोल्हापूर गादीवर कोणाला बसवाईचे हा प्रश्न शहाजी दुसरे यांना होता. त्यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वीच आपल्या मुलीचा मुलगा कोल्हापूरच्या गादीवर बसवण्याचं प्रयोजन केलं होतं. शहाजी दुसरे यांनी आपल्या मुलीचा मुलगा दत्तक म्हणून निवडला ते म्हणजे आजचे शाहू महाराज. नागपूरच्या भोसले घराण्यातील असलेल्या सध्याच्या शाहूंचे दिलीपसिंग हे मूळ नाव. राजाराम सिंग हे त्यांचे वडील तर शालिनी राजे या त्यांच्या आई. पुढे शहाजी महाराजांच्या निधनानंतर १९८४ ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर विराजमान झाले. शाहू महाराजांनाहि दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूप गाजले.

बॉटम लाईन काय तर, राजर्षी शाहू महाराज आणि शाहू छत्रपती हे दोघेही दत्तक होऊन राजघराण्यात आले. सध्याचे शाहू हे तसं पाहता राजर्षी शाहू यांच्या नातवाचे नातूच. या दोन्ही शाहूंनी पुरोगामी विचार, समता, समानता आणि सामान्य जनतेशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही, हेही तितकच खरं.

१८४८ साली लॉर्ड डलहौसी नावाचा एक इंग्रज अधिकारी गव्हर्नर म्हणून आला. त्यानं झांशीच्या राणीच संस्थान, नागपूरच्या भोसल्यांचं संथान, पेशवे यांच्या दत्तक पुत्र विधानाला विरोध केला. या देशात ज्याच्या घरात मूल नाहि त्या घरात कोणी दत्तक मूल घेतल्यांनंतर त्याला मुलाचाच दर्जा दिला जातो. याला विरोध करण्याचं काम लॉर्ड डलहौशीनं केलं. यामुळे संपूर्ण हिंदुस्तानात इंग्रजांच्या धोरणाला सर्वत्र विरोध झाला, सर्व राजे महाराजे ऐकवटले आणि १८५७ चा उठाव झाला. दत्तक पुत्र हा पुत्रच असतो घराचा वारसच असतो. खासदार संजय मंडलिक हे लॉर्ड डलहौसी यांच्या कुळातले आहेत काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.